पुणे : वर्ल्डकपमधील ( ICC Cricket World Cup 2023) पहिल्या तीन सामन्यात दमदार कामगिरी केलेल्या टीम इंडियाची लढत आज पुण्यातील एमसीए मैदानात बांगलादेशविरोधात होत आहे. या सामन्यात बांगलादेशला (India vs Bangladesh) चिरडून भारत सेमीफायनलसाठी आपली दावेदारी आणखी प्रबळ करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल यात शंका नाही. या सामन्यात किंग कोहली विराट विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.  


बांगलादेशविरुद्ध दमदार रेकॉर्ड


कोहलीने आजच्या लढतीत 35 धावा केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होणार आहे. सध्या चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माहेला जयवर्धने असून त्याला मागे टाकण्याची संधी कोहलीकडे आहे. त्यामुळे या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. विशेष म्हणजे त्याचा बांगलादेशविरुद्ध दमदार रेकॉर्ड आहे. 


कोहली बांगलादेश संघाचा कट्टर शत्रू


कोहलीला बांगलादेश संघाचा कट्टर शत्रू म्हणता येईल, कारण या संघाविरुद्धची एकदिवसीय सामन्यात त्याची सरासरी सर्वोत्तम आहे. कोहलीने बांगलादेशविरुद्ध एकूण 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 67.25 च्या सरासरीने 807 धावा केल्या. यामध्ये कोहलीने 4 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. या विश्वचषकात विराट कोहलीनेही चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 धावांची आणि अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 55 धावांची खेळी खेळली. मात्र, पाकिस्तानविरुद्ध त्याला केवळ 16 धावा करता आल्या. अशा स्थितीत कोहलीला पुन्हा एकदा लय मिळवण्याची संधी आहे.


पुण्यातील स्टेडियमवरही कोहली कायम नशीबवान 


पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यांमध्येही कोहलीचा दमदार रेकॉर्ड आहे. कोहलीने या मैदानावर आतापर्यंत 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 64 च्या सरासरीने 448 धावा केल्या आहेत. येथे त्याने 2 शतकेही झळकावली आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशी संघाला रोहित शर्मापेक्षा कोहलीकडून जास्त धोका दिसत आहे.


कोहली बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात



  • एकूण सामने : 15

  • धावा : 807

  • शतके : 4

  • पन्नास : 3

  • सरासरी: 67.25


एकदिवसीय विश्वचषकात कोहली बांगलादेशविरुद्ध



  • एकूण सामने : 3

  • धावा : 129

  • शतक : 1

  • सरासरी : 64.50


पुण्याच्या मैदानावर कोहली



  • एकूण सामने : 7

  • धावा : 448

  • शतके : 2

  • सरासरी : 64 


विश्वचषकात भारत-बांगलादेश आमनेसामने


वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश 4 वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडिया 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध फक्त एकदाच हरली होती. यानंतर टीम इंडियाने 2011, 2015 आणि 2019 मध्ये सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे या चारही प्रसंगी टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या