खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, एशियाड सुवर्णविजेती नेमबाज राही सरनोबत, थाळीफेकपटू नीरज चोप्रा यांचा अर्जुन पुरस्कारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
दादू चौगुले यांनी कुस्ती प्रशिक्षक म्हणून ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात येईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवार, 25 सप्टेंबर रोजी खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन, ध्यानचंद या पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल.
विराट हा 'खेलरत्न' पटकवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी 1997 साली सचिन तेंडुलकर आणि 2007 साली महेंद्रसिंग धोनी यांना 'खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. गेली दोन वर्ष विराटची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येत होती.
टीम इंडियाचा कर्णधार असलेला कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने अव्वल स्थान कायम राखलं आहे. 71 कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने 23 शतकांसह 6 हजार 147 धावा ठोकल्या आहेत. 211 वनडे सामन्यांमध्ये विराटने 35 शतकांसह 9 हजार 779 धावांचा डोंगर रचला आहे.
मीराबाईने गेल्या वर्षी 48 किलो वजनी गटात जागतिक वेटलिफ्टिंगचं, तर यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. मात्र दुखापतीमुळे एशियाडमध्ये ती चमक दाखवू शकली नाही.