केनिंग्टन ओव्हल (लंडन) : भारताचा कर्णधार विराट कोहलीनं ओव्हल कसोटीत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाचही कसोटी सामन्यात नाणेफेक हरण्याचा अनोखा विक्रम विराटच्या नावावर जमा झालाय.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाचहीवेळा नाणेफेकीचा कौल गमावणारा तो भारताचा आजवरचा तिसरा कर्णधार ठरला. या मालिकेत नाणेफेकीच्या वेळी पाचही वेळा विराटनं छापा (हेड्स) मागितला होता. मात्र पाचही वेळा काटाच (टेल्स) पडला आणि नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला.
याआधी 1948-49 साली वेस्ट इंडिजविरुद्ध लाला अमरनाथ यांनी पाचही सामन्यात नाणेफेक गमावली होती. त्यानंतर 1982-83 साली वेस्ट इंडिज दौऱ्यात कपिल देव यांच्यावरही अशीच वेळ ओढवली होती.
भारताकडून सलग पाच कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकणारे टायगर पतौडी हे एकमेव कर्णधार आहेत. 1963 साली पतौडींनी भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडविरुद्धच सलग पाच वेळा नाणेफेक जिंकली होती.