नवी दिल्ली : नव्याने चलनात आलेल्या नोटा फाटल्यास काय करावं, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आता मिटला आहे. दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा फाटल्यास बदलून मिळणार आहेत. अर्थ मंत्रालयाने खराब आणि फाटलेल्या नोटा बदलून देण्याबाबत 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

नोटाबंदीनंतर देशात दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आली. त्यानंतर दोनशे रुपयांची नोटही रिझर्व्ह बँकेने चलनात आणली. मात्र या नोटा खराब झाल्या किंवा फाटल्या, तर बदलून मिळत नव्हत्या. कोणताच कायदा नसल्याने बँक नोटा बदलून देण्यास नकार देत होत्या. मात्र अर्थ मंत्रालयाने आता अशा नोटा बदलून देण्याच्या प्रस्तावाला संमती दिली. अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

आतापर्यंत चलनात असलेल्या एक, दोन, पाच, दहा, 20, 50, 100, 500 आणि 1000 (सध्या चलनात नाही) रुपयांच्या नोटा बदलून मिळण्याची तरतूद होती. आरबीआयच्या नोटा बदलण्यासाठी असलेल्या नियम 2009 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आरबीआयने अर्थ खात्याकडे पाठवला होता. यानुसार नवे नियम मंत्रालयाने जाहीर केले.

आरबीआयच्या कलम 28 नुसार नोटाबंदीपूर्वी खराब आणि फाटक्या नोटा बदलण्याची परवानगी होती. मात्र नोटबंदीनंतर यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. यामुळे दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा बदलता येत नव्हत्या. यात संशोधन करुन आरबीआयने नवा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता.

8 नोव्हेंबर 2016 रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यानंतर वर्षभराने 200 रुपयांची नवी नोट बाजारात आली.