बंगळुरु : बंगळुरुमध्ये इंग्लंडविरोधातील तिसरा टी20 सामना जिंकून 'विराट'सेनेने टी20 मालिका खिशात घातली आहे. सोबतच कर्णधार कोहलीच्या नावे नवे विक्रमही रचले गेले आहेत. कसोटी, वनडे आणि टी20 या तिन्ही फॉर्मॅटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पणातच कोहलीने 'मालिकाविजय' मिळवला आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करत असतानाच्या मालिकेतच विजय मिळवण्याचा मान विराट कोहलीला मिळाला आहे. हा पराक्रम गाजवणारा कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.
कोहलीच्या टीम इंडियाने बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत इंग्लंडचा 75 धावांनी धुव्वा उडवून तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. 4 षटकात 25 धावा देऊन 6 विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल या विजयाचा खरा हिरो ठरला.
विशेष म्हणजे इंग्लंडविरोधातील ही पहिलीच टी20 मालिका टीम इंडियाने जिकली आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये खेळली गेलेली ही पाचवी टी20 मालिका आहे. मात्र पहिल्या चारही मालिकांमध्ये भारताला विजय मिळवता आला नव्हता.
विराटने ही मालिका गमावली असती, तर घरच्या मैदानात कोहलीच्या नेतृत्वात हरलेली ही पहिलीच मालिका ठरली असती.
इंग्लंडला भारतातून मालिका विजयाची चव चाखल्याशिवायच परतावं लागणार आहे. कारण 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट ब्रिगेडने इंग्लंडला 4-0 ने धूळ चारली होती. त्यानतंर तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली आणि त्यानंतर 3 सामन्यांची टी ट्वेंटी मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे.