सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये अभिनेते गिरीश ओक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. काल रात्री ओरोसमधील शासकीय विश्रामगृहातून त्यांचं सामान विनापरवानगी बाहेर फेकून देण्यात आलं. या अपमानास्पद वागणुकीबद्दल गिरीश ओक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काल दुपारी अभिनेते गिरीश ओक तुझे आहे तुजपाशी या आपल्या नाटकाच्या प्रयोगासाठी सिंधुदुर्गमधील ओरोसमध्ये दाखल झाले होते. यावेळी राहाण्यासाठी शासकीय विश्रामगृहाचा पर्याय त्यांनी निवडला. रात्री नियोजित प्रयोगासाठी ते बाहेर निघून गेले. रात्री विश्रामगृहावर आल्यावर त्यांना सामान बाहेर फेकून देण्यात आलेलं दिसलं.
शासकीय विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्यांना सामानाविषयी विचारता त्यांनी जिल्ह्याच्या सीईओंच्या नातेवाईकांना रुम हवी असल्यानं तुमचं सामान बाहेर काढून रुम त्यांना दिल्याचं सांगण्यात आलं. यावेळी इतक्या रात्री आम्ही कुठे जायचं या गिरीश ओक यांच्या प्रश्नावर कर्मचाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली. "तुम्ही एका दिवसासाठी येणार मात्र आम्हाला अधिकाऱ्यांना कायम उत्तर द्यावं लागतं." असं सांगण्यात आलं. या साऱ्या प्रकारानंतर गिरीश ओक यांनी मिळालेल्या वागणुकीवर एक व्हिडीओ जारी केला आहे. यात त्यांनी शासकीय विश्रामगृहावर नाराजी व्यक्त केली आहे.