बंगळुरु: रॉयल चॅलेजर्स बंगोलरचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं आयपीएलमधलं आपलं चौथं शतक ठोकलं आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात विराटनं अवघ्या 47 चेंडूंत आपलं शतक पूर्ण केलं.

 

बंगळुरुच्या सामन्यात विराटनं पंजाबच्या गोलंदाजांची अक्षरश: लक्तरं काढली. विराटनं अवघ्या 50 चेंडूंत 12 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर 113 धावांची तुफानी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये विराटच्या नावावर 13 सामन्यांत 865 धावा जमा झाल्या आहेत. ज्यात चार शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

 

दरम्यान, विराटच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झालेली असूनही त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळत दणदणीत शतक ठोकलं. कोलकात्याविरद्ध लढतीत झेल पकडण्याच्या प्रयत्नात विराटच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यावर उपचारासाठी विराटला मैदानाबाहेर जावं लागलं.

 

त्यावेळी देखील विराट जखमेवर पट्टी लावून पुन्हा मैदानात उतरला होता. इतकंच नाही तर त्यानं 51 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 75 धावांची खेळी करुन बंगलोरला विजयही मिळवून दिला होता.

 

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराटनंच सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटसोबतच आज गेलनंही तुफानी फटकेबाजी केली. गेलनं 32 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकार ठोकत 73 धावा केल्या.