उदय चोप्रा आणि नर्गिस फाक्रीचं व्हॉट्सअॅपवरुन ब्रेकअप?
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2016 04:40 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या घटस्फोट आणि ब्रेकअप्सची लाट आली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. चित्रपटातून गायब झालेला अभिनेता उदय चोप्रा आणि त्याची कथित प्रेयसी, अभिनेत्री नर्गिस फाक्री यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चवीने चघळल्या जात आहेत. उदय चोप्रा आणि नर्गिस यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दिलेली नसली, तरी दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याचं त्यांच्या जवळची माणसं सांगतात. उदय चोप्राने डच्चू दिल्याने नर्गिस रातोरात न्यूयॉर्कला निघून गेल्याचं सांगितलं जातं. बॉलिवूडलाईफ.कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार उदय चोप्राने व्हॉट्सअॅपवरुन नर्गिसशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर उदयला या ब्रेकअपमुळे फारसा त्रास झाला नसल्याचंही मानलं जातं, तर नर्गिस मात्र यामुळे उदास झाली आहे. दरम्यान, उदय चोप्राने तात्काळ एक स्टेटमेंट काढून या अफवा उडवून लावल्या आहेत. 'खरंतर मी अफवांना भीक घालत नाही, पण माझ्याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. मी आणि नर्गिस अजूनही चांगले मित्र आहोत. मात्र माध्यमांनी फार छान गोष्ट रंगवली आहे. मला ती फारच इंटरेस्टिंग वाटली, पण त्यात काडीमात्र सत्य नाही.' असं उदय चोप्राने स्पष्ट केलं आहे. काही महिन्यांपूर्वी इंडियनएक्स्प्रेस.कॉम दिलेल्या मुलाखतीत नर्गिसने उदय चोप्रा कायम माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहील, असं म्हटलं होतं.