मुंबई : पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दंड ठोठावण्यात आला आहे. गुरुग्राम महापालिकेने कोहलीला पाचशे रुपयांचा दंड केला आहे. कोहलीच्या गुरुग्राममधील निवासस्थानी काम करणारे कर्मचारी गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याची नासाडी करत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती.

गुरुग्राममधील डीएलएफ फेज 1 मध्ये विराट कोहलीचं घर आहे. घराबाहेर कोहलीच्या मालकीच्या सहा गाड्या उभ्या असतात. या गाड्या धुण्यासाठी कोहलीचे कर्मचारी पिण्याचं पाणी वापरत असल्याची तक्रार त्याच्या शेजाऱ्यांनी दिली होती. तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे गुरुग्राम महापालिकेने कोहलीच्या स्टाफकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला.



उत्तर भारतामध्ये उष्णतेची मोठी लाट पसरली आहे. त्यामुळेच पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा या भागात जाणवतो. अशा परिस्थितीत गाड्या धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी करणं बेजबाबदारीपणाचं लक्षण आहे. त्यातच हे पाणी पिण्याचं असल्यामुळे आणखी संताप व्यक्त होत आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात सध्या टीम इंडिया इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळत आहे. कोहलीचा व्याप पाहता, त्याच्या अनुपस्थितीत त्याचे कर्मचारी कोणतं पाणी कशासाठी वापरतात, याकडे लक्ष देणं त्याला किंवा पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मालाही शक्य नसेल. त्यामुळे कोहलीला नावं ठेवण्याऐवजी त्याच्या कर्मचाऱ्यांनाच समन्स बजावणं सयुक्तिक ठरेल.