मोहाली : अॅस्टन टर्नरच्या मॅचविनिंग खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं मोहाली वन डेत टीम इंडियाचा चार विकेट्सनी धुव्वा उडवला खरा, पण खराब क्षेत्ररक्षणच आमच्या हरण्याचं मुख्य कारण असल्याचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. आमचे खेळाडू मैदानावर सुस्त होते आणि त्याचाच फायदा ऑस्ट्रेलियाच्य़ा फलंदाजांनी घेतला. त्यामुळेचं त्यांना विजय मिळवता आला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी केली आहे.


“टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर सुस्त क्षेत्ररक्षण करत होते. सामन्यावर पकड मिळवण्यासाठी आम्हाला ज्या काही संधी मिळाल्या त्या संधीचा योग्य फायदा करुन घेण्यास अपयशी ठरलो आणि सामना आमच्या हातातून निसटत गेला. संपूर्ण सामन्यात खेऱपट्टी चांगली होती, पण अखेरच्या वेळेत गोलंदाजांना गोलंदाजी करण्यास कठीण झाले” असं मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांने व्यक्त केलं आहे. तसेच पुढील सामना रोमांचक होणार असल्याचंही कोहली म्हणाला.

दरम्यान चौथ्या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 359 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण सलामीचा उस्मान ख्वाजा आणि पीटर हॅन्ड्सकोम्बनं तिसऱ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी रचून कांगारुंच्या विजयाचा पाया रचला. हॅन्डस्कोम्बनं 105 चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकारांसह 117 धावांची खेळी साकारली. तर उस्मान ख्वाजानं सात चौकारांसह 97 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर अॅश्टन टर्नरनं दमदार फलंदाजी करत कांगारुंना सनसनाटी विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, शिखर धवन आणि रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं मोहाली वन डेत नऊ बाद 358 धावांचा डोंगर उभारला होता. धवन आणि रोहितनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. धवनने दमदार फलंदाजी करताना करताना 143 धावांची खेळी उभारली. तर रोहित शर्माचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं. रोहितनं 92 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 95 धावा फटकावल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 193 धावांची भागीदारी रचली.