मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आर्मी कॅप घालून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची तक्रार करण्यावरुन पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. आर्मी कॅप मैदानात उतरण्याबाबत रितसर परवानगी घेतली होती. तसंच या मागचा उद्देशही स्पष्ट केला होता, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे.
भारतीय संघाने आर्मी कॅप घातल्याने पाकिस्तानच्या डोळ्यात खुपले होते. याबाबत भारतीय क्रिकेट संघावर कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद खान यांनी केली होती. तसंच पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार ओवेस तौहिद आणि मझहर अब्बास यांनीही आर्मी कॅप घालण्याला विरोध दर्शवला होता.
भारतीय संघाने आर्मी कॅप घालून क्रिकेटमध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल करावी. जर भारतीय संघाने आर्मी कॅप घालणं थांबवलं नाही, तर पाकिस्तान संघही विश्वचषकात, काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधात काळ्या फिती लावून मैदानात उतरेल, असं पाकिस्तानचे माहिती प्रसारणमंत्री म्हणाले होते. मात्र याबाबत आयसीसीच्या परवानगीनेच आर्मी कॅप घालण्यात आल्याने फवाद खान यांना चपराक बसली आहे.
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली म्हणून भारतीय क्रिकेट संघाने आर्मी कॅप घालून सामना खेळला होता. शिवाय या सामन्यातून मिळालेलं मानधनही खेळाडूंनी लष्कर मदत निधीला दिला होता.
आर्मी कॅप घालून मैदानात उतरणे आयसीसीच्या परवानगीनेच, पाकिस्तान तोंडघशी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Mar 2019 11:26 AM (IST)
भारतीय संघाने आर्मी कॅप घातल्याने पाकिस्तानच्या डोळ्यात खुपले होते. याबाबत भारतीय क्रिकेट संघावर कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद खान यांनी केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -