मुंबई : विराट कोहली सध्या एक-एक करत क्रिकेटमधले सर्व विक्रम मोडत आहे. त्याने नुकताच सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. तसेच भारताची ही रन मशीन खूप वेगाने धावा आणि शतके करत आहे. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधली 37 शतके पूर्ण केली आहेत. त्यासोबत विराटने एम. एस. धोनी याच्यापेक्षा जास्त धाव करत भारतातर्फे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे.

प्रत्येक सामन्यानिशी विक्रम रचणारा भारतीय कर्णधार येत्या काळात अजून खूप विक्रम करणार आहे. विराट सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तो क्रिकेटमध्ये फलंदाजीतले सर्व विक्रम मोडीत काढतोय. त्यामुळे विराटवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेदेखील विराटवर स्तुतीसुमने उधळली आहेत. विरेंद्र सेहवाग म्हणाला, की विराट ज्या गतीने धावा करतोय, त्याकडे पाहिले तर लक्षात येते की, तो क्रिकेटमध्ये फलंदाजीतले सर्वच विश्वविक्रम मोडू शकेल. त्यामध्ये सचिनचे सर्व रेकॉर्ड्स मोडले जातील.

विराटचे कौतुक करत असताना सेहवाग म्हणाला की, विराट सचिनचे सर्व रेकॉर्ड्स मोडेल. परंतु सचिनचा एक रेकॉर्ड मोडणे त्याला शक्य नाही. सचिन त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 200 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या आहेत. विराटला कसोटीत 200 सामने खेळणे शक्य होणार नाही, असे मत सेहवागने व्यक्त केले आहे.

200 कसोटी सामने खेळण्यासाठी सचिन 24 वर्षे क्रिकेट खेळला. 24 वर्ष क्रिकेट खेळणे शक्य नसल्याने 200 टेस्ट खेळणे अवघड आहे. असे प्रतिपादन इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे विरेंद्र सेहवाग याने केले आहे.