मुंबई : मुंबई महापालिकेच्या मानखुर्द पोटनिवडणुकीसाठी आज (9 जानेवारी) मतदान होणार आहे. मानखुर्द वार्ड क्रमांक 141 मध्ये विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज मतदान होणार आहे. तर 10 जानेवारी रोजी फक्त एका तासातच निकाल जाहीर होणार आहे.


या निवडणुकीत, महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. 25 पैकी 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने 18 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. त्यामध्येही शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, कॉंग्रेसचे काजी अल्ताफ महंमद, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमाम ऊद्दीन आणि समाजवादीचे खान जमीर भोले या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार आहे.

या निवडणुकीत विठ्ठल लोकरे आणि बबलू पांचाळ यांचे पारडे जड आहे. मात्र या ठिकाणी मुस्लिम मतदारांचे प्रमाण जास्त असल्याने आणि विद्यमान आमदार, समाजवादीचे नेते अबू आजमी यांच्यामुळे समाजवादीच्या उमेदवारालाही संधी असणार आहे.

मात्र जर लोकरे यांचा विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महापालिका पोटनिवडणुकीतही पराभव झाल्यास त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार आहे. मात्र ते विजयी झाल्यास त्यांना महापालिकेत नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या गोटात बसून पुढे एखाद्या समितीचे अध्यक्षपद मिळू शकेल. तर भाजपचे बबलू पांचाळ हे विजयी झाले तर भाजपचे संख्याबळ एकने वाढणार आहे.

समाजवादी पक्षाचे उमेदवार जिंकले तर त्यांचेही संख्याबळ एकने वाढणार आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार जिंकले तर काँग्रेसने आपली जागा राखल्याचे मानसिक समाधान त्यांना मिळणार आहे.

याव्यतिरिक्त, रिपब्लिकन सेनेचे संबोधी कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अमोल क्षीरसागर आणि 11 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच या 18 उमेदवारांपैकी 10 उमेदवार मराठी भाषिक तर 8 उमेदवार उर्दू भाषिक आहेत. त्यामुळे मुस्लिमबहुल या मतदारसंघात मुस्लिम वोट बँकमध्ये मतांची विभागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

9 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या कालावधीत मतदान होणार आहे. तर 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून अवघ्या एका तासातच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.