सोशल मीडियावर विराट कोहली ट्रोलिंगचा सावज ठरला. नव्याने लाँच करण्यात आलेल्या 'विराट कोहली ऑफिशियल अॅप'चं प्रमोशन याला निमित्त ठरलं. या प्रमोशनल व्हिडिओत विराटने एका क्रिकेट रसिकाला भारत सोडून निघून जायला सांगितलेलं दिसतं. त्या चाहत्याचा गुन्हा काय तर त्याने केलेली पोस्ट.
भारतीय खेळाडू ओव्हररेटेड आहेत. एक फलंदाज म्हणून सध्या विराट कोहलीचं खूपच स्तोम माजवण्यात येत आहे. त्याच्या फलंदाजीत विशेष असं काही नाही. सध्याच्या भारतीय फलंदाजांपेक्षा मला इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज अधिक भावतात, असं या चाहत्याने लिहिलं.
तुम्ही या देशात राहू नये, अशा शब्दात कोहलीने चाहत्याला उत्तर दिलं. इथे राहायचं आणि परदेशी खेळाडूंचं कौतुक करायचं हे योग्य नाही. तुम्ही भारतातून चालते व्हा आणि इतर देशात राहा, असा अनाहूत सल्ला कोहलीने दिला.
विराट कोहलीने स्वतःला हर्षल गिब्जसारखे परदेशी खेळाडू आवडतात, इथपासून विराटने लग्नही परदेशात केलं, याचा त्याला विसर पडला आहे का, अशा पद्धतीचं ट्रोलिंग सोशल मीडियावर होत आहे. मात्र कोहलीला खरोखर राग आला, की यामागे प्रमोशनचा फंडा आहे, हे लवकरच समजेल.