पुणे : पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराची एक वेगळीच घटना समोर आली आहे. बायकोचे वजन वाढल्यामुळे तिला उपाशी ठेवण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कोंढवा येथे समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुंड्यासाठी, पैशांसाठी, मूल होत नाही म्हणून बायकोचा छळ झाल्याच्या असंख्य घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. परंतु कोंढवा परिसरातील उंड्री येथे हा वेगळा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका ३४ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे. त्यावरून तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांचे जून 2006 मध्ये लग्न झाले होते. हे जोडपे उंड्री येथील इस्टेट इस्टोनिया सोसायटीत रहात होते. लग्नानंतर सहा महिन्यातच दोघांमध्ये घरगुती कारणांवरून भांडणे होऊ लागली. तसेच दरम्यानच्या काळात फिर्यादी महिलेचे वजन वाढले होते. ते वाढलेले वजन कमी व्हावे यासाठी आरोपीने तिला जबरदस्तीने उपाशी ठेवले. हा प्रकार कित्येक दिवस सुरूच होता. याबरोबरच आरोपीने पत्नीच्या आई-वडिलांची बदनामीदेखील केली.
2006 ते 2016 दरम्यान सातत्याने त्या महिलेला आरोपीने त्रास दिला. त्यानंतर अचानक राहत्या घरातून निघून गेला. तो सध्या बावधन येथे राहत आहे. त्याने उंड्री येथील घर सोडल्यानंतर पत्नीला घटस्फोटासाठीचा अर्ज पाठवला. मात्र, फिर्यादी महिलेला घटस्फोट नको आहे. त्यामुळे समुपदेशकाकडे त्यांच्या समुपदेशनाच्या काही फेऱ्या झाल्या. मात्र, त्यासही पतीने दाद दिली नाही. त्यामुळे तिने पोलिसांत फिर्याद दाखल केली.
मुलांच्या संगोपनाचा प्रश्न
फिर्यादी महिला आणि तिचा पती दोघेही खासगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांना दोन मुले आहेत. तिचा छळ करून पती तिला न सांगता घरातून निघून गेल्यानंतर ती मुलांसह एकटीच राहत होती. मात्र, त्यानंतर तिच्या पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. तसेच, पत्नी राहत असलेला फ्लॅट विकण्यासाठी आरोपीने तिच्यावर दबाव आणला. गेल्याच महिन्यात त्या महिलेची नोकरीदेखील गेली असून, तिच्यापुढे मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीत मुलांचा सांभाळ कसा करणार? कुठे राहणार? हे प्रश्न तिला भेडसावू लागल्याने तिने अखेर पोलिसांत धाव घेतली.