भारतीय खेळाडू ओव्हररेटेड आहेत. एक फलंदाज म्हणून सध्या विराट कोहलीचं खूपच स्तोम माजवण्यात येत आहे. त्याच्या फलंदाजीत विशेष असं काही नाही. सध्याच्या भारतीय फलंदाजांपेक्षा मला इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज अधिक भावतात, असं एका चाहत्याने लिहिलं होतं.
'मला ट्रोलिंगची सवय आहे. कमेंट्समध्ये 'हे भारतीय' ज्या पद्धतीने लिहिलं होतं, त्याबद्दल मी भाष्य केलं, मी कायमच व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करत आलो आहे. फार गांभीर्याने घेऊ नका. सणाचा आनंद घ्या' अशा आशयाचं ट्वीट विराटने आज केलं आहे.
चाहत्याला भारत सोडून जाण्याचा सल्ला दिल्यानंतर विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सावज ठरला. नव्याने लाँच करण्यात आलेल्या 'विराट कोहली ऑफिशियल अॅप'च्या प्रमोशनल व्हिडिओत विराटने एका क्रिकेट रसिकाला भारत सोडून निघून जायला सांगितलेलं दिसत होतं.
तुम्ही या देशात राहू नये, अशा शब्दात कोहलीने चाहत्याला उत्तर दिलं. इथे राहायचं आणि परदेशी खेळाडूंचं कौतुक करायचं हे योग्य नाही. तुम्ही भारतातून चालते व्हा आणि इतर देशात राहा, असा अनाहूत सल्ला कोहलीने दिला होता.
विराट कोहलीने स्वतःला हर्षल गिब्जसारखे परदेशी खेळाडू आवडतात, इथपासून विराटने लग्नही परदेशात केलं, याचा त्याला विसर पडला आहे का, अशा पद्धतीचं ट्रोलिंग सोशल मीडियावर होत आहे.