मुंबई : अख्ख्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणाऱ्या पु.ल. देशपांडे यांचा बायोपिक लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पु.ल. चे लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला पहायला मिळणार आहे.


याअगोदर आपण पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या साहित्यावर आधारीत अनेक चित्रपट आणि नाटकं पाहिली आहेत. आता दस्तुरखुद्द पुलंच्याच जीवनावर आधारीत चित्रपट येतोय. ही रसिकांसाठी मेजवानीच ठरणार आहे.


‘भाई, व्यक्ती की वल्ली?’ असे या चित्रपटाचे नाव आहे. पाडव्याच्या शूभ मुहुर्तावर या चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला. ‘भाई…’ ४ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शीत होईल. या चित्रपटामध्ये ‘हंटर’ आणि ‘वायझेड’ फेम अभिनेता सागर देशमुख या पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर इरावती हर्षे यामध्ये सुनिताबाई म्हणजेच पुलंच्या पत्नीच्या भूमिकेत पहायला मिळतील.