डर्बन : विराट कोहलीने झळकवलेलं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 33 वं शतक आणि अजिंक्य रहाणेच्या साथीने त्याने रचलेली अभेद्य भागीदारी यांच्या जोरावर टीम इंडियाने डर्बनच्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासोबतच विराट दिग्गजांच्या पंक्तीत बसला आहे.


विराटने आतापर्यंत टीम इंडियाचं 44 सामन्यांमध्ये नेतृत्त्व केलं आहे. या 44 सामन्यांपैकी 34 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर 9 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना भारताला करावा लागला. विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचीही बरोबरी केली.

कर्णधार या नात्याने 44 सामन्यांपैकी 34 विजय मिळवण्याचा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. या 44 पैकी 8 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. विराट कोहलीने या विक्रमाचीही बरोबरी साधली.

या यादीत वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लीव्ह लॉईड यांचाही तिसऱ्या क्रमांकावर समावेश आहे. त्यांच्या नेतृत्त्वात वेस्ट इंडिजने 44 पैकी 34 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. तर 10 पराभवांचा सामना करावा लागला होता.