कोलंबो : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वन डेतही शानदार शतक ठोकलं. 107 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत त्याने वन डे कारकीर्दीतलं तिसावं शतक पूर्ण केलं. सोबतच सर्वाधिक वन डे शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता रिकी पाँटिंगसोबत दुसऱ्या स्थानावर आला आहे.
वन डेत सर्वाधिक 49 शतकं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर 30 शतकं आहेत. आता विराटनेही पाँटिंगची बरोबरी करत वन डे कारकीर्दीतलं तिसावं शतक पूर्ण केलं.
विशेष म्हणजे विराट वन डेच्या आतापर्यंत 186 इनिंग खेळला आहे. यामध्येच त्याने 30 शतकं पूर्ण केली. सचिनचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 16, तर पाँटिंगचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 15 शतकं होते. म्हणजेच विराटने या दिग्गजांच्या दुप्पट वेगाने शतकं पूर्ण केली आहेत.
विराटने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन डेतही शतक पूर्ण करत सनथ जयसुर्याला मागे टाकलं होतं. त्यानंतर आता त्याने रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली. आणखी एका शतकानंतर वन डेतील सर्वाधिक शतकांच्या यादीत दोन भारतीय दिग्गज पहिल्या स्थानावर असतील.