नवी दिल्ली : या वर्षात नवनवे विक्रम नावावर करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात विराटने 50 धावा केल्या. यासोबतच तीन कसोटी मालिकांमध्ये 600 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू बनला आहे.
विराटने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 610 धावा केल्या. शिवाय त्याने 2016-17 च्या सत्रात इंग्लंडविरुद्ध 655 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 692 धावा केल्या होत्या.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 5 डावांमध्ये विराटने एकदा नाबाद खेळी करत 610 धावा केल्या. कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने 104 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर कोहलीने नागपूर कसोटीत 213 धावांची खेळी केली.
दिल्ली कसोटीत विराटने शानदार 243 धावांची खेळी केली आणि सलग दोन द्विशतक ठोकणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावातही 50 धावांची खेळी केली. या मालिकेत त्याने 152 च्या सरासरीने धावा काढल्या. शिवाय 82.21 च्या स्ट्राईक रेटने 57 चौकार आणि चार षटकार ठोकले.
यापूर्वी कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन वेळा नाबाद खेळी करत 655 धावा केल्या होत्या. यामध्ये दोन शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. या मालिकेत 235 ही त्याची सर्वोच्च खेळी होती. कोहलीने 60.87 च्या स्ट्राईक रेटने एकूण 72 चौकार आणि एक षटकार ठोकला होता.
राजकोटमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीतल्या पहिल्या डावात 40 आणि दुसऱ्या डावात विराटने नाबाद 49 धावांची खेळी केली. विशाखापट्टणममध्ये त्याने 167 आणि 81 धावा केल्या. मोहालीमध्ये 62 आणि नाबाद 6, मुंबई कसोटीत 235 आणि चेन्नई कसोटीत 15 धावांची खेळी केली.
विराटने पहिल्यांदा 600 पेक्षा जास्त धावा 2014 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत केल्या होत्या. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने आठ डावांमध्ये 86.50 च्या सरासरीने 692 धावा केल्या होत्या. यामध्ये चार शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता.
या मालिकेतील 692 धावांमध्ये 77 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. कोहलीने अॅडिलेड कसोटीतील दोन्हीही डावांमध्ये शतकी खेळी केली होती. त्याने पहिल्या डावात 115, तर दुसऱ्या डावात 114 धावा केल्या. मेलबर्न कसोटीत 169 आणि 54, तर सिडनी कसोटीत 147 आणि 46 धावांची खेळी केली.