मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्यातल्या तीन कसोटी, पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याचा 9-0 असा ऐतिहासिक क्लीन स्विप साजरा केला. पण त्याच टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांमध्ये कस लागणार आहे. कारण आयसीसीच्या वन डे सामन्यांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या वन डे सामन्यांची लढाई विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.


विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांमध्येही आक्रमकता ठासून भरली आहे. आजच्या जमान्यातल्या सर्वोत्तम फलंदाजांच्या शर्यतीत त्या दोघांचाही समावेश होतो. त्यामुळं पाच वन डे सामन्यांच्या मालिकेचा मुख्य चेहरा हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या लढाईचा असला तरी त्या विराट आणि स्मिथमधलं द्वंद्व ही या लढाईची मुख्य उत्सुकता राहील.

विराट कोहलीनं आजवरच्या कारकीर्दीत 194 वन डे सामन्यांमध्ये 8587 धावांचा रतीब घातला आहे. त्यात 30 शतकं आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. वन डे क्रिकेटमधल्या सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट आणि रिकी पॉन्टिंग संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. पण विराटनं वन डे क्रिकेटमधली त्याची 30 शतकं ही केवळ 194 सामन्यांमध्ये झळकावली आहेत, तर पॉन्टिंगला तितक्याच शतकांसाठी तब्बल 359 सामन्यांमध्ये खेळावं लागलं होतं. विराटच्या तुलनेत स्टीव्ह स्मिथची वन डे क्रिकेटमधली कामगिरी विशेष लक्षवेधक नाही. स्मिथनं आजवरच्या कारकीर्दीत 98 वन डे सामन्यांमध्ये आठ शतकं आणि 17 अर्धशतकांसह 3187 धावा फटकावल्या आहेत.

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथची वन डे क्रिकेटमधली हीच कामगिरी लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनं आगामी द्वंद्वात विराटला झुकतं माप दिलं आहे. त्याच्या मते, विराट हा स्मिथच्या तुलनेत वन डे क्रिकेटमधला सरस फलंदाज आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्या दोघांत स्मिथ उजवा आहे.

स्टीव्ह स्मिथनं आजवरच्या कारकीर्दीत 56 कसोटी सामन्यांमध्ये 5370 धावांचा रतीब घातला आहे. त्यात वीस शतकं आणि एकवीस अर्धशतकांचा समावेश आहे. विराटनं आजवरच्या कारकीर्दीतल्या 60 कसोटी सामन्यांमध्ये 4658 धावा फटकावल्या आहेत. त्यात 17 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये याच वर्षी झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट सपशेल अपयशी ठरला होता. तीन कसोटी सामन्यांमधल्या पाच डावांत मिळून त्याला केवळ 46 धावाच जमवता आल्या होत्या. स्मिथनं मात्र या मालिकेत धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले होते. त्यानं चार कसोटी सामन्यांमधल्या आठ डावांत मिळून 499 धावा वसूल केल्या होत्या. स्मिथच्या या कामगिरीला तीन शतकांचाही साज होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची 2-1 अशी सरशी झाली असली तरी त्या मालिकेतलं वैयक्तिक अपयश विराटला अजूनही बोचत असावं. एकीकडे स्मिथ धावांचा रतीब घालत असताना, दुसरीकडे आपल्यावर धावा रुसल्या असल्याचं ते चित्र भारतीय कर्णधारासाठी नक्कीच क्लेशदायक ठरावं. कसोटी मालिकेतल्या त्या अपयशाची आता वन डे सामन्यांच्या मालिकेत दामदुपटीनं भरपाई करण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न राहिल. आणि विराटनं त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केला, तर टीम इंडियाला विजयापासून रोखणं शक्य नाही.