या सामन्यामुळे दिनेश कार्तिक सर्वांच्या लक्षात राहिला. मात्र विजय शंकरलाही कोणी विसरणार नाही.
शेवटच्या सामन्यात शंकरने 17 चेंडूत 19 धावा केल्या. झटपट धावा करण्याची गरज असताना शंकरने संथ फलंदाजी केल्याने तो टीकेचा धनी बनला. तो प्रचंड दबावात होता. जर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, तर शंकरवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतं.
या सर्व परिस्थितीमुळेच सामन्यानंतरही शंकर दबावात होता. त्यामुळेच त्याने स्वत:ला कोंडून घेतलं होतं.
जर दिनेश कार्तिकने तो सिक्स मारला नसता, तर काय झालं असतं, हाच विचार शंकरच्या डोक्यात घोंघावत होता. मी इतके बॉल वाया घालवले नसते, तर विजय इतका लांबला असता का? असे प्रश्न विजयच्या डोक्यात येत होते.
"मी दिनेश कार्तिकचा खूप आभारी आहे, मात्र चांगला सामना जिंकून देण्याची संधी मी वाया घालवली याचं वाईटही वाटतं", असं शंकर म्हणाला.
शंकरने अंतिम सामन्यानंतर हॉटेलच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतलं होतं. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबतची माहिती दिली.
"मी खूपच अस्वस्थ होतो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मी दरवाजा बंद केला. मात्र माझा दरवाजा ठोठावून दिनेश कार्तिक आला आणि त्यानेच मला धीर दिला", असं शंकर म्हणाला.
कार्तिकने मला मनोबल दिलं, त्यामुळेच माझ्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालं, असं त्याने सांगितलं.
विजयने 18 व्या षटकात मुस्ताफिजूर रहमानच्या ओव्हरमध्ये सलग चेंडू वाया घालवले होते. त्यामुळे भारताला विजय मिळवणं अतिशय अवघड झालं होतं. मात्र दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 29 धावा करुन, अशक्य वाटणारा विजय खेचून आणला.