अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून लीक झाली होती. या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे.
सोमवारी फेसबुकच्या संपत्तीत 37 अब्ज डॉलरची घट झाली. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनाही 6.6 अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांत फेसबुकची चौकशीही सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'कॅम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला, असाही आरोप आहे.
ब्रिटनस्थित कॅम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कशाप्रकारे मदत केली, यासंदर्भात अमेरिकन आणि युरोपियन खासदारांनी 'फेसबुक इंक'कडे उत्तर मागितले आहे.
एकंदरीत फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.