नवी दिल्ली: टीम इंडियाचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यात सुरु असलेल्या वादात मोठा खुलासा झाला आहे. लंडनमध्ये राहात असलेल्या मोहम्मद भाईने शमीवरील मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळले आहेत.


शमी पूर्णत: निर्दोष आहे. मॅच फिक्सिंगशी माझा किंवा शमीचा काहीही संबंध नाही, असं मोहम्मद भाईने एका मुलाखतीत सांगितलं.

मात्र शमी आणि त्याच्या पत्नीला मी इंग्लंडमध्ये भेटलो होतो, अशी कबुली मोहम्मद भाईने दिली.

मी क्रिकेटचा चाहता आहे. जग जसं शमीला ओळखतं, तसंच मी सुद्धा त्याला ओळखतो. इंग्लंडमधील कोणत्यातरी एका सामन्यादरम्यान शमीची आणि माझी ओळख झाली होती, असं मोहम्मद भाई म्हणाला.

इतकंच नाही तर शमी एक चांगला माणूस आहे. शमी आणि त्याची बायको इंग्लंडमध्ये आले होते तेव्हा मी वेळात वेळ काढून त्यांना लंडन फिरून दाखवलं होतं, त्यांच्यासोबत जेवण केलं. त्यानंतर त्यांना विमानतळावर सोडायलाही गेलो होतो, अशी सगळी माहिती मोहम्मद भाईने दिली.

माझ्यावरील मॅच फिक्सिंगचे आरोप चुकीचे आहेत. मी कोणतंही चुकीचं काम केलं नाही. मी गेल्या 25 वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहात असलो, तरीही माझ्या शरिरात भारताचंच रक्त आहे. कोणत्याही परिस्थितीत मी देशाशी गद्दारी करणार नाही. मी तिरंगा कधीही झुकू देणार नाही, असं मोहम्मद भाई म्हणाला.

अलिश्बाला ओळखत नाही

मोहम्मद शमीची पाकिस्तानी मैत्रिण आलिश्बाबत मोहम्मद भाईला विचारलं असता, मी अशा नावाच्या कोणत्याही मुलीला ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी हे नाव पहिल्यांदाच मीडियातून ऐकल्याचं ते म्हणाले.

VIDEO:


अलिश्बाचा दावा

पत्नी हसीन जहाच्या आरोपांनंतर अडचणीत आलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पाकिस्तानी मैत्रिण आलिश्बा  समोर आली. मॅच फिक्सिंगचे आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचा दावा आलिश्बाने केला. शमी धोका कधीच देऊ शकत नाही, असं म्हणत चौकशीत सर्व प्रकारचं सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं ती म्हणाली.

आलिश्बासोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट असल्याचा आरोप हसीन जहाने केला होता. ज्यामध्ये शारीरिक संबंध आणि पैशांची देवाणघेवाण करण्याविषयी चर्चा करण्यात आली. बीसीसीआय शमीला पैसे देत असताना तो पाकिस्तानी तरुणीकडून पैसे का घेतो, असा सवाल हसीन जहाने उपस्थित केला होता. दरम्यान, मोहम्मद शमीनेही हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला होता.

संबंधित बातम्या
शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा 

बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी 

मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी

कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?

दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां

फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा