नागपूर : फैझ फझलच्या विदर्भाने सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरुन नवा इतिहास घडवला आहे. नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. या सामन्यात विदर्भाने सौराष्ट्राला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. पण आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे यांच्या फिरकी आक्रमणासमोर सौराष्ट्राचा दुसरा डाव 127 धावांत आटोपला.
डावखुरा स्पिनर आदित्य सरवटेने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सहा फलंदाजांना माघारी धाडलं. अक्षय वाखरेनेही पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात तीन विकेट्स काढून आपल्या ऑफ स्पिनची कमाल दाखवली. सौराष्ट्रतर्फे विश्वराज जाडेजाने सर्वाधिक 52 धावा केल्या.
मुंबई आणि महाराष्ट्र या थोरल्या भावंडांचं आव्हान यंदा रणजी करंडकाच्या साखळीतच संपुष्टात आलं होतं. त्यामुळं धाकट्या विदर्भाचं रणजी करंडकातलं घवघवीत यश अधिकच उठून दिसतं.
विदर्भाच्या फायनलमधल्या विजयाचा आदित्य सरवटे हा प्रमुख शिल्पकार ठरला. सरवटेच्या डावखुऱ्या फिरकीनं रणजी फायनलला विदर्भाच्या बाजूने गिरकी दिली. त्याने अंतिम सामन्यात अकरा विकेट्स काढल्याच, पण सौराष्ट्राच्या चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत मिळून केवळ एकच धाव करु दिली. पहिल्या डावात पुजाराने सरवटेच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये वासिम जाफरच्या हाती झेल दिला. दुसऱ्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही. सरवटेने त्याला पायचीत केलं.
याच पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या चार कसोटी सामन्यांमध्ये तीन शतकांसह 521 धावांचा रतीब घातला होता. पण फायनलच्या रणांगणात सरवटेने त्याला घडवलेला धावांचा उपवास विदर्भाला रणजी करंडकाचा मान देणारा ठरला.
विदर्भाच्या लोअर मिडल ऑर्डरने दोन्ही डावांत बजावलेली कामगिरी फायनलच्या लढाईत खूपच मोलाची ठरली. विदर्भाने पहिल्या डावात सहा बाद 139 धावांवरुन सर्व बाद 312 धावांची मजल मारली. अक्षय वाडकर, अक्षय कर्णेवार आणि अक्षय वाखरे या तीन नावबंधूंनी रचलेल्या छोट्या, पण झुंजार भागीदारी कमालीच्या होत्या. दुसऱ्या डावात आदित्य सरवटेने बॅट चालवली म्हणूनच विदर्भाने सहा बाद 105 धावांवरुन सर्व बाद 200 धावांची मजल मारली. विदर्भाच्या लोअर मिडल ऑर्डरची हीच कामगिरी रणजी करंडकाच्या अंतिम लढाईत निर्णायक ठरली.
रणजी करंडकाच्या यंदाच्या अख्ख्या मोसमाचा विचार करायचा झाला, तर विदर्भाच्या अनुभवी शिलेदारांनी आपली कामगिरी चोख बजावली. पाहूया...
* वासिम जाफर - यंदाच्या मोसमात अकरा सामन्यांमध्ये 69.13च्या सरासरीने 1053 धावांचा रतीब.
* कर्णधार फैझ फझल - 11 सामन्यांमध्ये 50.13 च्या सरासरीने 752 धावा.
* यष्टीरक्षक आदित्य वाडकर : 11 सामन्यांमध्ये 60.41 च्या सरासरीने 725 धावा. यष्टीपाठी 21 झेल आणि सहा यष्टिचीत.
* गणेश सतीश : 11 सामन्यांमध्ये 33.80 च्या सरासरीने 507 धावा.
* अष्टपैलू आदित्य सरवटे : 11 सामन्यांमध्ये 354 धावा आणि 53 विकेट्स.
* ऑफ स्पिनर अक्षय वाखरे : 10 सामन्यांमध्ये 34 विकेट्स, त्यात अंतिम सामन्यात सात विकेट्स
* वेगवान गोलंदाज उमेश यादव : अवघ्या तीन सामन्यांमध्ये 23 विकेट्स
* ललित यादव : सहा सामन्यांमध्ये 19 विकेट्स
यंदाच्या रणजी करंडकातल्या विदर्भवीरांची नावं तरी किती घ्यायची? विदर्भाच्या प्रत्येक शिलेदारानं आपली कामगिरी अगदी चोख बजावली. म्हणूनच चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाला सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर आपलं नाव कोरता आलं.
विदर्भाचं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Feb 2019 11:22 AM (IST)
या सामन्यात विदर्भाने सौराष्ट्राला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. पण आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे यांच्या फिरकी आक्रमणासमोर सौराष्ट्राचा दुसरा डाव 127 धावांत आटोपला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -