नवी दिल्ली : बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीच्या अध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा देणारा वेंकटेश प्रसाद आता किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात सामील झाला आहे. पंजाबने आयपीएलच्या आगामी मोसमासाठी गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी प्रसादवर सोपवली आहे.

ऑस्ट्रेलियाचा टी-20 क्रिकेटमधला स्टार शिलेदार ब्रॅड हॉजची किंग्स इलेव्हनच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. हॉजने टी-20 सामन्यांमध्ये 7 हजारहून अधिक धावांचा रतीब घातला आहे.

यंदाच्या आयपीएलसाठी सर्वच संघांची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. पंजाबने नुकतीच कर्णधारपदाची धुरा भारताचा फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यानंतर आता प्रशिक्षकांचं नावही जाहीर करण्यात आलं.

पंजाबच्या संघात युवराज सिंह, डेव्हिड मिलर यांच्यासारखे अनुभवी खेळाडू असताना कर्णधार म्हणून अश्विनची निवड करण्यात आली. अश्विन यापूर्वी आयपीएलच्या 8 मोसमांमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळला आहे, तर दोन वेळा रायझिंग पुणे सुपरजायंटचं प्रतिनिधित्व त्याने केलं आहे.