मेजर गौरव आर्य यांनी ट्विटरवरुन कॅडेट ओम पैठणेची प्रेरणादायी कहाणी शेअर केली आहे. ओम पैठणे हा पुण्याचा रहिवासी. ओला कॅबमध्ये तो ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे अहोरात्र मेहनत करुन कुटुंबाचं पोट ओम भरत होता.
ओला टॅक्सी चालवण्याची नोकरीच त्याच्या स्वप्नपूर्तीचा दुवा ठरली. एके दिवशी एका प्रवाशाने ओला बुक केली. तो प्रवासी होता आर्मी कर्नल. प्रवासादरम्यान दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. बोलता-बोलता विषय निघाला सैन्य दलाचा. कर्नलनी ओमला लष्कराविषयी भरभरुन सांगितलं. हे ऐकून ओम भारावून गेला.
ओमने कर्नलसाहेबांकडून प्रेरणा घेतली आणि लष्करात भर्ती होण्याच्या स्वप्नाने तो झपाटून गेला. मेहनत करुन त्याने ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी जॉईन केली. सशस्त्र सीमा दलाची परीक्षा ओमने दिली आणि तो पास झाला. कॅडेट ओम पैठणे दहा मार्च रोजी ऑफिसर म्हणून पासआऊट होणार आहे.
महत्त्वांकाक्षा असेल आणि चिकाटीने मेहनत करण्याची तयारी असेल, तर कोणतंही स्वप्न साध्य करता येतं, हे ओम पैठणेच्या उदाहरणातून नक्कीच शिकता येईल.