मुंबई : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना घेऊन सीबीआय मुंबईतील भायखळा तुरुंगात दाखल झाली. इंद्राणी मुखर्जी आणि कार्ती यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे.


कार्ती चिदंबरमना हात बांधून भायखळा तुरुंगात आणण्यात आलं. इंद्राणी मुखर्जी आणि कार्ती यांना समोरासमोर बसवून सीबीआय चौकशी करणार आहे. चौकशीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्ती यांना अटक करण्यात आली आहे. लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कार्ती यांच्यावर गेल्या वर्षी मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता.

आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक गैरपद्धतीने आणण्यासाठी कार्ती यांनी साडेतीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात म्हणजे पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्रिपदी असताना हा प्रकार घडला होता.

वडिलांच्या नावाचा वापर करुन कार्ती यांनी लाच मागितल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने मॅजिस्ट्रेटसमोर केला होता. आयएनएक्स मीडियाची स्थापना इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांनी केली होती.

शीना बोरा हत्येप्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी आणि वडील पीटर 2015 पासून तुरुंगात आहेत. या प्रकरणाचा तपासही सीबीआयकडे आहे.