क्राईस्टचर्च (न्यूझीलंड) :  पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.

या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयासाठी २७३ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ६९ धावांत आटोपला.

भारताकडून ईशान पोरेलनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याआधी, या विश्वचषकात सातत्यानं फलंदाजी करणारा शुभमन गिल भारतीय डावाचा पुन्हा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात नाबाद शतक झळकावून भारताला ५० षटकांत नऊ बाद २७२ धावांची मजल मारुन दिली. गिलनं ९४ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी उभारली.

या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरानं ८९ धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया रचला होता. शॉनं ४१, तर कालरानं ४७ धावांची खेळी केली. भरवंशाचा हार्विक देसाई वीस धावांवर बाद झाला.

दरम्यान, ईशान पोरेलनं पाकिस्तानच्या चार प्रमुख फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडून, आपल्या पारपंरिक प्रतिस्पर्धी संघाच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. तर शिवा सिंग आणि रियान पराग यांनी प्रत्येक दोन गडी बाद केले.