१९ ऑगस्ट २०१२ रोजी माझ्या वडीलांचा अपघात झाला. अपघाताने त्यांच्या मेंदूला इजा पोहोचली. मोठा रक्तस्त्राव झाला. न्युरोसर्जन डॉक्टर दत्तप्रसन्न काटीकर यांच्या बिनीट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. तेंव्हा वडीलांचे वय होते ८० वर्षे आणि ती शस्त्रक्रिया मोठी होती. त्यात बरीचशी गुंतागुंत होती. डॉक्टरांनी आम्हाला त्याची रीतसर कल्पना दिली. परगावी मोठ्या हुद्द्यावर असलेली माझी भावंडं तातडीने सोलापुरास आली. शस्त्रक्रिया केली नाही तरी रिस्क होती आणि केली तरीही रिस्क होतीच. त्यामुळे आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांना तसे कळवले. २० ऑगस्टला शस्त्रक्रिया पार पडली. काही तास वडील बेशुद्धावस्थेत होते. शुद्धीवर आल्यानंतर काही तासांनी त्यांना फिट्स सीझर्स आल्या. असे काही होऊ शकते असे डॉक्टरांनी आधीच कळवले होते त्यामुळे आम्ही फारसे पॅनिक झालो नाही. त्या दिवसानंतर त्यांची प्रकृती कमीजास्त होत राहिली. यामुळे दिवसभर दवाखान्यात थांबणे होऊ लागले. आमचे कुटुंब मोठं असल्याने अन नातलग व वडीलांचा मित्र परिवार मोठा असल्याने रोज खंडीभर माणसं भेटायला येत. त्यांच्या दिमतीला आणि दवाखान्यातील कमीजास्त पाहण्यासाठी, औषधपाण्यासाठी दोघा तिघांना थांबावं लागे. पहिले दोन दिवस आमच्याच दुःखाच्या ओझ्याखाली दबून होतो. तिथला मुक्काम वाढू लागला तसे तिथल्या इतर लोकांकडे माझे लक्ष जाऊ लागले......


या हॉस्पिटलला आत जाण्याचा एक मुख्य मार्ग वगळता आणखी एक प्रवेशद्वार होते जे आयपीडीत ऍडमिट पेशंटच्या रूम्स दिशेने असलेल्या जिन्याकडे उघडत होते. ओपीडीचे पेशंट या बाजूने येजा करत नसत. माझ्या वडीलांना इथं आणलेल्या दिवसापासून या जिन्यात एक माणूस बसलेला दिसे. बिनइस्त्रीचा चुरगळलेला पांढरा ढगळ पायजमा सदरा त्यांच्या अंगात असे, सदऱ्याचे हातुपे दुमडलेले असत. डोईवर गांधी टोपी, पायात जाडजूड रबरी सोल मारलेली काळी चामडी पायताणं असत. अदमासे पस्तीस - सदतीस वर्षाचा हा इसम डोळे मिटून सदैव हात जोडून बसलेल्या मुद्रेत रंग रंग असा जप करत बसलेला दिसे. त्याच्या रापलेल्या काळपट तेलकटलेला चेहऱ्यावर चिंतेचं जाळं ओघळत असे. वरून डॉक्टरांनी त्यांच्या नावाचा पुकारा केला की अस्वस्थ होऊन तो वर धाव घेत असत. त्यांचे कोण इथे ऍडमिट आहे हे मला कळले नव्हते. शिवाय ते एकटेच कसे दिसतात, त्यांचे अन्य नातलग नाहीत का, त्यांना इतकी चिंता कशाची असे प्रश्न त्यांना बघितलं की डोक्यात यायचे. त्यामुळे दोनेक दिवसानंतर पहाटेच्या वेळेस हॉस्पिटलसमोरील चहाच्या हातगाडीवर मी मुद्दामच आपण होऊन त्यांच्याशी बोललो. त्यांचं नाव बहुधा नवनाथ पवार होतं. मोहोळ तालुक्यातल्या रोपळ्या जवळ त्यांची वस्ती होती. त्यांची दोनपाच एकर कोरडवाहू जमीन होती. शिक्षण बेताचेच झालेलं त्यामुळे शेतातली कामं सरली की गावातल्या एकमेव मारवाडी कुटुंबाच्या दुकानात कामाला जात. त्यांची पत्नी त्याच कुटुंबाच्या घरी घरकामास मदतीस जाई. त्यांना तीन मुली होत्या. मोठी मुलगी जेमतेम सोळा वर्षाची तर धाकटी बारा वर्षांची. तीन मुलींच्या पाठीवर चार वर्षांच्या अंतराने मुलगा झालेला. आपला हा मुलगा नवसा सायासाने अन देवाच्या कृपेने झाला अशी त्यांची श्रद्धा. त्यांचे सगळं घर माळकरी. दर साली माघवारीला न चुकता जाणारे अन बारा महिन्याच्या चोवीस एकादशी धरणारं. त्यामुळे मुलाचं नाव पांडुरंग ठेवलेलं. अगदी पापभीरु, सालस, साधीभोळी अन कुणीही निर्व्याज प्रेम करावं अशी ती माणसं होती. मुलाच्या जन्मानंतर या कुटुंबाला साक्षात विठ्ठल घरी आल्याचा आनंद झाला. सगळया घरात चैतन्याचे झरे वाहू लागले, अख्खे कुटुंब सुखात न्हाऊन निघालं.

बघता बघता दिवस वेगाने पुढं जाऊ लागले. आता त्यांची चारही अपत्य शाळेत जाऊ लागली. पांडुरंगाची अभ्यासात गोडी जास्ती होती, सर्व परीक्षात त्याला चांगले गुण असत. वर्गात अव्वल नंबर असे. पांडुरंग नऊ वर्षाचा असताना त्याला एके दिवशी ताप आला. तरीही तो शाळेत गेला. त्याचा ताप एकदोन दिवस कमी जास्त होऊ लागला. त्याच्या वडीलांनी त्याला गावातल्या दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याची जुजबी तपासणी केली, इंजेक्शन दिली. काही औषधे दिली. जुजबी उपचार झाल्याने ताप कमी झाला. पण पुन्हा अधूनमधून सारखा ताप येऊ लागला. पुन्हा दवाखाना अन पुन्हा शाळा सुरुच राहिली. पांडुरंगास काही केल्या शाळा बुडवायची नव्हती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मात्र त्याला फणफणुन ताप आला तो काही केल्या कमीच होईनासा झाला. अखेर ते त्याला घेऊन मोहोळला गेले. तिथल्या डॉक्टरांनी काही उपचार केले यात पुन्हा पंधरा दिवस गेले. एके दिवशी तो तापात चक्कर येऊन पडला तेंव्हा मात्र मोहोळमधल्या डॉक्टरांनी काही तपासण्या करून त्यांना सोलापुरात मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला.

पांडुरंगास घेऊन ते इथं सोलापुरात बिनीट हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्या आणि त्याच्या मेंदूत मोठी गाठ झाल्याचे व त्याचवेळी मेंदूत देखील ताप उतरला असल्याचे विविध तपासण्यातून निदान केले. पवारांची परिस्थिती अत्यंत बेताची होती. दवाखान्यातील उपचार त्यांच्या हाताबाहेरचे होते. तरीही पहिले दोन दिवस त्यांनी तग धरले. तिसऱ्या दिवशी त्याचे ऑपरेशन करण्याचे ठरले. इकडून तिकडून किडूक मिडूक विकून त्यांनी पैसे गोळा केले. पांडुरंगाच्या आईस सोलापूरला बोलवले गेले. त्या रात्री पांडुरंग शुद्धीत होता. आईच्या कुशीत त्याला छान झोप लागली. ती माऊली मात्र रडवेली झालेली. मुलाची नजर चुकवून सारखा डोळ्याला पदर लावून राही. मुलाला शक्य तितकं घट्ट ओढून पडली होती. त्याचं सावळं रूप डोळ्यात साठवत होती. भल्या सकाळी उठून त्यांना काही तरी खाता येणार होतं कारण शस्त्रक्रियेआधी काही तास त्याचं पोट रिते असणे आवश्यक होतं. त्याच्या आईवडीलांनी वडापावसाठी दहा रुपये त्याच्या हातावर ठेवले. तिघे मिळून खाली आले. त्याने एकच वडा खाल्ला, उरलेले पाच रुपये वडिलांना परत दिले. "अण्णा लई खर्च होतोय, मला जास्ती भूक नाही.. एकच वडा बास... बरा झाल्यावर उरलेल्या पाच रुपयाचा वडा खाईन.. नाहीतर आत्ता आईला एक वडापाव घेऊन द्या.... " तापाने पिवळट चेहरा झालेला पांडुरंग उद्गारला आणि ते नवरा बायको ढसाढसा रडले. पोराला करकचून पोटाशी आवळून धरलं. त्यांची ती पाखरागत अवस्था पाहून चहा विकणारया हातगाडीवाल्याने त्यांना शांत केले. त्यांना धीर दिला.

त्या दिवशी पांडुरंगावर शस्त्रक्रिया पार पडली. आता काही तासात आपला मुलगा शुद्धीवर येईल या आशेने ते जिन्यात बसून होते तर पांडुची आई ऑपरेशन थियेटरबाहेर शून्यात नजर लावून गोठून गेलेल्या अवस्थेत बसून होती. पांडुरंगाच्या वडीलांची स्थिती इतकी हलाखीची होती की, खर्च खूप होईल म्हणून तो माणूस गावाकडून डबा येईपर्यंत एक कप चहावर बसून राही. त्याच्या आईने तर कडकडीत उपवास सुरु केलेले. डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेचे धोके त्यांना आधीच सांगितले होते. पांडुरंगाची शस्त्रक्रिया झाल्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या वडीलांना तिथे दाखल केलेले. त्यामुळेच पांडुरंगाचे वडील मला कायम जिन्यात बसलेले दिसत. त्यांना आशा होती की आज ना उद्या आपला मुलगा शुद्धीवर येईल. पुढे खर्च परवडेनासा झाला तेंव्हा त्यांनी मुलाला जनरल आयसीयुत ठेवले. बायकोला गावी परत पाठवून दिले. दरम्यान त्यांच्या गावी ही बातमी सर्वांना कळली अन अख्ख्या गावाचा जीव हळहळला. अनेक बायाबापडया कळवळून गेल्या, लोकांनी मदतीचा ओघ सुरु केला. एके दिवशी त्यांचे मारवाडी मालक येऊन मदत देऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या बायकोला घेऊन त्यांच्या मालकीणबाई आल्या. त्यांनी त्या दिवशीचा खर्च केला. एके दिवशी शाळेचा सगळा स्टाफ येऊन पैसे देऊन गेला. पांडुरंगावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थीमित्रांनी काही पैसे गोळा करून पाठवून दिले, गावातल्या पुढाऱ्यांनी काही पैसे दिले. या सर्व रकमा तुटपुंज्या होत्या पण त्यांचे दाते मात्र हिमालयाच्या काळजाचे होते ! जमेल त्या माणसाने जमतील तितके पैसे दिले. सोयरया धायरयांनी पैसे दिले. जमीन गहाण टाकून झाली, सोनंनाणं विकून झालं. पार मोकळे झाले ते ! तरी हाताशी काही लागलेलं नव्हतं.मनात साचलेलं हे सगळं मळभ माझ्यापाशी रितं करताना त्यांच्या डोळ्यातून चंद्रभागा वाहत होती आणि दूर धुरकट अंधारात साक्षात विठ्ठल डोळे पुसत उभा होता. सकाळ अजून पुरती उजाडलेली नसल्याने हवेत एक खिन्न करणारा गारवा भरून होता. सुसू आवाज करत वारं कानात शिरत होतं आणि माझ्या पुढ्यात मरणाच्या उंबरठयावर निजलेल्या एकुलत्या एक पोराचा असहाय बाप बसून होता.....

असेच आणखी काही दिवस गेले. पांडुरंग काही शुद्धीवर आला नाही. दिवस जातच राहिले तसे पांडुरंगाचे वडील आयसीयुत जाणाऱ्या प्रत्येक माणसास विचारु लागले. "आमच्या पांडुरंगाने डोळे उघडले का हों ?" हा प्रश्न विचारतानाच त्याच्या डोळ्यात पाणी तरळलेलं असे. "आमच्या पोराचे हातपाय हलले का ? त्याने काही हालचाल केली का ? काही हाक मारली का ? आईंचा धावा केला का ? अण्णा अण्णा म्हणून दचकून जागा झाला का ?" असे प्रश्न ते दबक्या हताश आवाजात विचारत. कालांतराने त्यांच्या देहबोलीत कमालीची निराशा जाणवू लागली. चेहरा म्लान होत गेला. दवाखान्यात ये जा करताना मी आता पांडुरंगाच्या वडीलांना चुकवून आत बाहेर करत होतो. त्यांना पाठीमागून पाहायचो. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद माझ्यात कदापिही नव्हती. त्या दिवशी पांडुरंगाची तब्येत खूप खालावल्याचे डॉक्टरांनी त्यांना कळवले. गावाकडे सांगावा धाडला गेला. दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या तीन मुली तिथे आल्या. त्यांच्या लाडक्या भावाला दवाखान्यात आणल्यापासून त्यांना भेटीस येता आलं नव्हतं. त्यादिवशी आल्यावर मात्र त्यांचा आवेग कुणालाच आवरता आला नाही. त्या तिन्ही बहिणींनी दुःखवेदनेने टाहो फोडले, जीवाचा एकच आकांत केला. अश्रुंचे पाट वाहिले. त्यांना पाहणारे सगळे दिग्मूढ होऊन गेले. अखेर त्या तिन्ही मुलींना शांत करण्याचे काम त्या अभागी बापाला करावे लागले. मुलींचे सांत्वन करून मग पांडुरंगाची आई त्यांना सोबत घेऊन गावाकडे परतली.

ती संध्याकाळ फारच जड गेली. हवेतले चैतन्य हरपले होते. सगळं वातावरण उदास होतं. आभाळाचा कुंदपणा मनात उतरत होता. सारा आसमंत बधीर झाल्यागत होता. दिगंताला सूर्यगोल अंधारात बुडून गेला अन पांडुरंगाचे प्राणपाखरू उडून गेले. अहोरात्र जिन्यात बसून असणाऱ्या पांडुरंगाच्या वडीलांनी आपल्या पोराच्या निष्प्राण कलेवरास कवटाळून आक्रोश केला. त्यांच्या घरी बातमी कळवली गेली. रात्री गावात मृतदेह घेऊन शीव ओलांडणे अशक्य होते. त्या रात्री पांडुरंगाचे शव तिथेच दवाखान्यात ठेवले गेले. सकाळ होताच डॉक्टरांनी स्वखर्चाने शववाहिकेत त्याचा अचेतन देह गावाकडच्या अखेरच्या प्रवासाला पाठवून दिला. हॉस्पिटलचे निम्मे अर्धे बिल देखील त्यांनी माफ केले. त्या दिवशी दुपारी तो जिना खूपच रिकामा वाटला. तिथला सन्नाटा खूपच जीवघेणा होता. एका हरलेल्या बापाचे ओझे वाहून अन अश्रू झिरपून तिथं एक उदासी आली होती. त्या दिवशी पांडुरंगाच्या कुटुंबावर, मायबापावर, बहिणींवर कोणता प्रसंग गुदरला असेल याची कल्पना माझ्या उभ्या आयुष्यात आजवर करता आली नाही. कारण त्या आठवणींनीच जीव व्याकूळ होऊन जातो. ते दिवस मी कधीच विसरू शकलो नाही.....

सप्टेबरच्या त्या सर्द दिवसात भल्या सकाळी चहाच्या गाडीवर बसून आपल्या पोराने परत दिलेली पाच रुपयाची ती नोट दाखवताना अब्जावधीची दौलत हाती असल्याचा भाव पांडुरंगाच्या वडीलांच्या चेहऱ्यावर निरखला होता. त्यांनी ती पाच रुपयाची नोट अजूनही जपून ठेवली असेल अन नंतरही जरी कधी कितीही कडकी आली तरी ती नोट ते कधीच खर्च करणार नाहीत याची मला खात्री आहे...

पांडुरंगाच्या निधनाने मला जबर मानसिक धक्का बसला अन बळही मिळाले. कारण माझ्या वडीलांचा दवाखाना प्रदीर्घ लांबला. त्यांना प्रचंड त्रास झाला. त्यांनी मोठी झुंज दिली. २० जून २०१४ रोजी माझ्या वडीलांचे देहावसान झाले. या सर्व अतिव दुःखाच्या काळात काटीकर हॉस्पिटलच्या आयसीयुमधे निपचित पडून असलेला पांडुरंग आणि खिन्न अवस्थेत जिन्यात बसून असणारे त्याचे वडील सावली बनून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात राहत होते, मला धीर देत होते, माझे मन घट्ट करत होते. त्यांच्या आभाळाएव्हढ्या दुःखाने ते बापलेक माझे दुःख नकळत हलके करत गेले....

आजही कधी काटीकर डॉक्टरांच्या बिनीट हॉस्पिटलजवळून गेलो तर पांडुरंगाचे अभागी वडील तिथे वावरत असल्याचा भास होतो अन घामाने मळकटून गेलेली ती पाच रुपयाची नोट डोळ्यापुढे तरळत राहते....