रिओ दी जनैरो : भारताचा पैलवान नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकमधल्या सहभागावर पुन्हा  प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नरसिंगला डोपिंग प्रकरणी क्लीनचिट देण्याचा 'नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी' अर्थात 'नाडा'चा निर्णय 'वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी'नं फेटाळून लावला आहे.


 
'वाडा'ने 'नाडा'च्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं आहे. या प्रकरणात उत्तर देण्यासाठी नरसिंगनं दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. त्यामुळे आता त्याची सुनावणी 18 ऑगस्टला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता होईल.

 
रिओ ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाईल कुस्तीतल्या 74 किलो वजनी गटाच्या लढती 19 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहेत. त्यासाठी नरसिंग काही दिवसांपूर्वीच रिओमध्ये दाखलही झाला.

 

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांबद्दल मला विचारु नका, मला त्या गोष्टींचा आता विचारही करायचा नाही. माझ्यासमोर आता केवळ भारतासाठी पदक जिंकायचं हेच एक लक्ष्य आहे, असं तो म्हणाला होता. नरसिंगला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार की नाही, याचा निर्णय आता क्रीडा लवाद घेऊ शकतील. तूर्तास नरसिंगच्या सहभागावर प्रश्नचिन्ह कायम आहे.