कोलंबो : कुशल परेराच्या वेगवान अर्धशतकी खेळीच्या जोरावर तिरंगी मालिकेतल्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 5 विकेट्स राखून पराभव केला. टीम इंडियाने दिलेलं 175 धावांचं आव्हान श्रीलंकेने 18.3 षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.


कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कुशल परेराने अवघ्या 37 चेंडूत 67 धावा फटकावत भारतीय गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्यात त्याने सहा चौकार आणि चार उत्तुंग षटकार ठोकले. त्यानंतर श्रीलंकेच्या दसून शनाका आणि थिसारा परेराने श्रीलंकेच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी दोन, तर जयदेव उनाडकटने एक विकेट घेतली.

त्याआधी शिखर धवनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला 175 धावांचं आव्हान दिलं होतं. सलामीचा रोहित शर्मा आणि सुरेश रैना स्वस्तात माघारी परतल्यामुळे टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. पण त्यानंतर शिखर धवनने मनीष पांडेच्या साथीने 95 धावांची भागीदारी रचत टीम इंडियाचा डावाला आकार दिला.

धवनने 49 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह 90 धावा केल्या. धवनचं ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतलं पहिलंवहिलं शतक दहा धावांनी हुकलं. तर मनीष पांडेने तीन चौकार आणि एका षटकारासह 37 धावांचं योगदान दिलं.