नॉटिंघम : इंग्लंडच्या झुंजार फलंदाजीने नॉटिंगहॅम कसोटीत टीम इंडियाला पाचव्या दिवसाची प्रतीक्षा करायला भाग पाडलं आहे. टीम इंडिया विजयापासून अवघी एक पाऊल दूर आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी संपूर्ण चौथा दिवस खेळून काढला.


या कसोटीत जसप्रीत बुमराने दुसऱ्या नव्या चेंडूवर इंग्लंडची पुन्हा दाणादाण उडवून, टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. पण तळाच्या तीन फलंदाजांनी केलेल्या संघर्षाने इंग्लंडला चौथ्या दिवसअखेर नऊ बाद 311 धावांची मजल मारून दिली आणि भारताला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतीक्षा करायला लावली.

ही कसोटी जिंकण्यासाठी भारताला केवळ एकच विकेट हवी असून, इंग्लंडसमोर अजून 210 धावांचं डोंगराएवढं आव्हान आहे.

नॉटिंगहॅम कसोटीत चौथ्या दिवशी उपाहाराला इंग्लंडची चार बाद 84 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. शतकवीर बटलर आणि स्टोक्सने पाचव्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी रचून भारताचा विजय लांबवला. मग

रशिद आणि ब्रॉड या जोडीने नवव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी रचून भारताचा विजयाचा मार्ग अडवून धरला. पण भारताकडून जसप्रीत बुमराने सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्माने दोन, शमी आणि पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.