जोहान्सबर्ग : ''टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठा बदल झाला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल, असं मत दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर एबी डिव्हिलिअर्सने व्यक्त केलं आहे.


भारताने दक्षिण आफ्रिकेत अजून एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. 2011 मध्ये मालिकेतील 1-1 बरोबरी ही भारताचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात पाच जानेवारीपासून होईल.

डिव्हिलिअर्स जवळपास दोन वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या झिम्बाम्ब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात तो खेळणार आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियाशी भिडणं हे एक आव्हान असेल, असं डिव्हिलिअर्सचं म्हणणं आहे.

''भारताविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारताविरुद्ध खेळलेलो नाही. त्यामुळे ही मालिका चांगली असेल'', असं ‘संडे टाइम्स’ने डिव्हिलिअर्सच्या हवाल्याने म्हटलं आहे. आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डिव्हिलिअर्स हा देखील एक महत्त्वाचा खेळाडू आहे.

''विराट जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. त्याला पहिल्यांदा कर्णधार म्हणून जेव्हा पाहिलं होतं, त्या तुलनेत आता त्याच्यामध्ये मोठा बदल झाला आहे'', असं डिव्हिलिअर्स म्हणाला.

''कर्णधार म्हणून विराटने किती योगदान दिलंय ते आम्हा सर्वांना माहित आहे. तो नक्कीच इथे जिंकण्यासाठी येईल आणि इतिहास रचेल'', असं डिव्हिलिअर्स म्हणाला.