लंडन : तुफान फॉर्मात असलेला पृथ्वी शॉ आणि सिनीअर संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या मयंक अग्रवाल यांनी आज मैदान गाजवलं. या दोघांच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारतीय अ संघाने लिसेस्टरशायरविरुद्ध खेळताना 50 षटकात 459 धावांचं आव्हान उभं केलं.


भारतीय अ संघाकडून पृथ्वीने 90 चेंडूत 132 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये 20 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. त्याने आपल्या खेळीमध्ये 98 धावा केवळ चौकार आणि षटकारांनीच जमवल्या. तर रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी मयंकने 106 चेंडूत 151 धावा केल्या, ज्यामध्ये 18 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे.

पहिल्या सामन्यात चार धावा करुन माघारी परतणाऱ्या मयंकने या सामन्यात मात्र लिसेस्टरशायरच्या गोलंदाजांची धुलाई केली. पृथ्वीने 77 चेंडूत, तर मयंकने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 26 षटकात 221 धावांची भागीदारी केली.

पृथ्वी बाद झाल्यानंतर अंडर-19 विश्वचषकातील भारताचा हिरो शुबमन गिल खेळण्यासाठी उतरला. त्याने मयंकची साथ देत 35 षटकांमध्येच धावसंख्या 300 च्या पुढे नेली. त्याने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, विशेष म्हणजे त्याने एकाच षटकात सलग चार षटकार ठोकले.

भारतीय अ संघाने 43 व्या षटकातच 400 चा आकडा पार केला होता. मात्र या धावसंख्येवर ऋषभ पंत 13 धावांवर बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर गिल 86 धावा करुन माघारी परतला. त्याने 54 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकार ठोकले.

अखेरच्या षटकांमध्ये दीपक हुड्डाने नाबाद 34 आणि कर्णधार श्रेयस अय्यरने 15 धावांची खेळी केली.

भारतीय अ संघ वन डे तिरंगी मालिकेत इंग्लंड अ आणि वेस्ट इंडिजच्या अ संघासोबत भिडणार आहे. 22 जून ते 2 जुलै या काळात ही मालिका खेळवण्यात येणार आहे.