बर्थडे स्पेशल: कोहलीच्या पाच 'विराट' खेळी
याच वर्षी भारतात झालेल्या टी-20 विश्वचषकात कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 81 धावांची धडाकेबाज खेळी केली. कोहलीच्या या खेळीने टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली.
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने काल आपला 28 वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. क्रिकेटच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करताना विराटची प्रत्येकवेळी संयमी, तर कधी धडाकेबाज खेळी पाहायला मिळते. विराटच्या वाढदिवसानिमित्त अशा पाच खेळींची माहिती देणार आहोत, ज्याने प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरली होती, आणि विराटने अक्षरश: विजय खेचून आणला.
2014 च्या टी-20 विश्वचषकात कोहलीने 44 चेंडूत 72 धावांची खेळी केली. भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये धडक मारली.
2009 मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 118 धावांची चमकदार खेळी करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 316 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाने 23 धावांवर दोन गडी गमावले होते. पण विराटच्या शतकी खेळीने टीम इंडियाला हे लक्ष्य सहज साध्य करता आले.
2012 मध्ये आशिया चषकावेळी विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 148 चेंडूत 183 धावांची खेळी केली होती. कोहलीच्या या विराट खेळीने भारतीय संघाने 330 धावांचे लक्ष्य 2 ओव्हर बाकी असतानाच साध्य केलं.
भारतीय भूमीवर 2013 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही कोहलीची धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली. कोहलीने या मालिकेतील एका सामन्यात सर्वात जलद शतक झळकावले. त्याने 52 चेंडूत 100 धावा ठोकल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 360 धावांची गरज होती, पण कोहलीच्या दमदार खेळीने टीम इंडियाला हे सहज साध्य झाले.