Krishna Nagar in Final : पॅरालिम्पिकमध्ये आज सकाळी दोन पदकं भारताच्या खात्यात आल्यानंतर आता आणखी एक पदक निश्चित झालं आहे. पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागर (Krishna Nagar) फायनलमध्ये पोहोचला आहे. तो उद्या सुवर्णपदकासाठी लढणार आहे. या लढतीत तो जिंकला तर भारताला अजून एक सुवर्णपदक मिळेल. तो यात पराभूत जरी झाला तरी त्याचं रौप्यपदक निश्चित आहे. आज झालेल्या सेमीफायनलमध्ये त्यानं ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आजच्या दिवसाची सुरुवात सोनेरी झाली . 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदकासह रौप्यपदक देखील मिळालं आहे. भारताच्या मनीष नरवालनं 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे तर सिंहराजनं याच प्रकारात रौप्यपदक मिळवून दिलं आहे. सिंहराज अधानानं याआधी कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं होतं. आता त्यानं रौप्यपदक जिंकून आपलं दुसरं पदक निश्चित केलं आहे.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी दोन पदकाची भर पडली आहे. भारताच्या खात्यात आता एकूण 15 पदकं झाली आहेत. मनीष नरवालनं भारताला या स्पर्धेतलं तिसरं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. हरियाणाच्या कथुरा गावातल्या या 19 वर्षीय युवा खेळाडूनं इतिहास रचला आहे. मनीषनं पहिल्या दोन शॉटमध्ये 17.8 स्कोर केला होता. मात्र त्यानंतर त्यानं शानदार वापसी केली. पाच शॉट नंतर मनीष नरवाल टॉप थ्रीमध्ये आला. पाच शॉटनंतर त्याचा स्कोर 45.4 होता तर 12 शॉट नंतर मनीषचा स्कोर 104.3 होता.
याआधी भारताला अवनी लेखरानं 10 मीटर शूटिंगमध्ये तर सुमित अंतिलनं भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. काल भारताच्या हरविंदर सिंहने इतिहास रचला. हरविंदर सिंहने टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करत पुरुष एकल Recurve Open मध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे.
भारतानं आतापर्यंत जिंकलेली पदकं
सुवर्णपदक - 03
रौप्यपदक- 07
कांस्यपदक - 05
एकूण - 15