चाकरमानी! आम्हा कोकणवासियांसाठी जवळचा, आपुलीचा, हक्काचा आणि हवाहवासा वाटणारा शब्द. किमान प्रत्येक घरामागे एक माणूस मुंबईला हे चित्र नक्की दिसून येत असे. काळ बदलला आणि मोठ्या प्रमाणात कोकणवासी मुंबईची वाट धरू लागली. कधी शिक्षण, कधी घरची परिस्थिती तर कधी वाढती जबाबदारी आणि त्यातून आलेलं पोक्तेपण या साऱ्यामागे असेल कदाचित. पण, यामुळे झालं असं की गावचं घर, वाडा आणि कधीकाळी गजबजलेलं गाव शांत भासू लागलं. घरामध्ये एकतर म्हातारं माणूस, मोजकीच माणसं किंवा घर बंद असं चित्र. हे सारं काहीही असो पण, आमच्या चाकरमान्यांनी गावच्या घराकडे पाठ फिरवली असं झालं नाही. गावी कोण असेल तर त्याला शक्य तेवढं सारं काही देणं किंवा मग सणांसाठी गावी दाखल होणं. परिस्थिती काहीही असो गाव, घर, सण यांची ओढ कधी कमी झाली नाही आणि ती होणार देखील नाही. असो. तर हे सारं आठवण्यामागचं कारण म्हणजे येऊ घातलेला आमचा गणेशोत्सवाचा सण. प्रत्येक सणाला आमचा चाकरमानी आपल्या मुळगावी दाखल होतो बरं का? प्रसंगी नोकरी सोडून. कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण, सुट्टी मिळत नाही म्हणून खोटं कारण सांगून प्रसंगी नोकरी सोडून गावी आलेले शोधल्यास त्यांची संख्या मोठी असेल. पण, आता ऑफिसला पण कळून चुकलं असेल कोकणी माणूस म्हटल्यावर शिमगा, गणपती आणि त्रिपुरारी पौर्णिमेला गावी जाणारच. या साऱ्यामध्ये एक गोष्टीची आम्हाला कायम उत्सुकता असते ती चाकरमान्याकडून येणाऱ्या भेट वस्तुंची अर्थात त्याला आम्ही भ्याट देखील म्हणतो!


गावी येताना चाकरमान्यांची भ्याट आम्हा सर्वांना आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरातून येताना माझ्या भावानं, काकानं, मामानं काय काय आणलं आहे यावर आमची नजर आणि त भ्यॅट हातात केव्हा पडणार याची उत्सुकता. फळं, खाऊ, कपडे आणि अगदी मच्छि देखील कधीकाळी आम्हाला मुंबईहून येत असे. सध्या जमाना खासगी कारचा, लक्झरी गाड्यांचा आणि सुपरफास्ट ट्रेनचा आहे. गावागावांमध्ये दुकानं थाटली गेलीत. मुंबई मिळणारी एखाद्या ब्रँडची फस्ट कॉपी आम्हाला देखील सहज मिळते. ठराविक अंतरानंतर मोठ्या प्रमाणात बाजारपेठा तयार झाली आहे. मोबाईलचा वापर खुबीनं करत मार्केटिंग केली जात आहे. गावागावात इंटरनेट पोहोचलंय. एलईडी टीव्ही आलीय. दारासमोर बुलेट उभी आहे. पण, चाकरमान्याचं महत्त्व मात्र तितकंच आहे. मुंबईहून येणाऱ्या भ्याटच्या वस्तुंमध्ये काहीसा बदल झालाय. त्याचं स्वरूप बदललं आहे. पण, आपुलची आणि मिळणाऱ्या भ्याटची ओढ मात्र कायम आहे. 


काही वर्षे मागे गेल्यास गावागावांमधून मोठ्या प्रमाणावर एसटी दाखल होत. त्यांच्या टपावर अर्थात कॅरियरवर मोठ्या प्रमाणत वस्तु बांधलेल्या असत. एसटी येण्याचा एक ठराविक अंदाजे वेळ असायचा. त्यापूर्वी गावातील एसटी स्टॅन्डवर जाऊन थांबण्याची मजा काही और असायची. मुंबईहून येणाऱ्या माणसांच्या हातातील बॅग धावत धावत घेण्यामध्ये पोरांमध्ये जणू स्पर्धा असायची. मोठ्या अवधीनंतर सर्वांची भेट होणार असल्यानं मनात आनंदाच्या उकाळ्या फुटायच्या. कधी कधी तर दोन - चार गाड्या एकाच दिवशी असल्यानं आपण पुढे धावत गेलेल्या एसटीतून किंवा गाडीतून आपलं कुणी उतारलं नाही म्हटल्यावर हिरमोड व्हायचाय पुन्हा मागून येणाऱ्या गाडीकडे नजर लावून बसायची. साधारण गणपती असो अथवा शिमगा, उन्हाळ्याची सुट्टी असो अथवा गावची जत्रा चाकरमान्यांच्या वाटेकडे नजर आणि त्यांच्या येण्याची उत्सुकता मात्र सारखीच आणि कायम. 


ठराविक कालावधीनंतर चाकरमानी परतीच्या वाटेला लागल्यानंतर मन खिन्न होऊन जात असे. कारण दिवस कधी संपले यांचं भानच नसायचं. त्यात पुन्हा भेट नेमकी केव्हा होणार याचा काही नेम नसायचा. चाकरमान्यांना आणायला जाण्याची उत्सुकता त्यांना निरोप देताना देखील कायम असायची. पण, मन खिन्न असायचं.गाडीची वेळ आणि आवराआवर यामध्ये दिवस निघून जायचा. स्टॅन्डवर सोडायला गेल्यानंतर हातात किमान दहा रूपयापासून अगदी पन्नास रूपयापर्यंतची नोट पडायची. त्यामुळे पुढील किमान चार दिवस एकदम ऐश, आम्ही शेठ माणूस असायचो. आकाश जणू ठेंगणं वाटायचं. शिवाय, मुंबईला जाणाऱ्या गाडीच्या मागे झाडाची फांदी किंवा एखादी वस्तु अडकवण्यासाठी त्याचवेळी पोरांची धांदल देखील उडायची. 


हळूहळू हे सारं काही बदललं. दारात खासगी गाड्या दिसू लागल्या. पत्र, तार यांच्यांवरून चाकरमान्यांची येण्याची - जाण्याची तारीख आणि खुशाली कळणं देखील बंद झालं. कारण, गावागावत फोन बुथ आले. घरांमध्ये फोनच्या रिंग खणाणू लागल्या. आता हे सारं होत नाही तोच मोबाईल आले. व्हिडीओ कॉल, चॅटिंग सुरू झाली. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये मोठा बदल झाला. अगदी 'मुंबई - पुणे देखील वन डे रिटर्न'वर आलं. सुटकेसची जागा ब्रॅन्डेड बॅग्सनी घेतली. हे सारं काहीही असो. पण, चाकरमान्याचा महत्त्व कालही होतं, आजही आहे शिवाय उद्या देखील राहिल. कारण, चाकरमानी आणि त्याची भ्याट ही उत्सुकता आजही कायम आहे. कारण बॅग खोलल्यानंतरचा येणारा 'भ्याट सुगंध' आजही हवाहवासा आणि आपुलकीचा वाटतो.