नवी दिल्ली : भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमने महिलांच्या 51 किलो वजन गटात टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे . जॉर्डनमध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेची उपांत्य फेरी गाठत तिने आपलं ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित केलं. मेरी कोम, अमित पंघालसह सात बॉक्सर्सनी ऑलिम्पिकमधील आपली जागा पक्की केली आहे.


मेरी कोमने 51 किले वजनी गटात फिलिपिंसच्या 28 वर्षीय आयरिश मेगनो हिचा 5-0 ने पराभव केला. मेरी कोमने तिसऱ्या आणि शेवटच्या राऊंडमध्ये आपल्या अनुभवाचा फायदा घेत प्रतिस्पर्धी मेगनोवर हल्ला चढवला आणि सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. सेमीफायनलमध्ये मेरी कोमचा सामना चीनच्या युआन चांगसोबत होणार आहे. अमित पंघालने 52 वजनी गटात फिलिपिंसचा कार्लो पालमचा 4-1 ने पराभव केला. आता सेमीफायनलमध्ये अमित पंघालचा सामना चीनच्या के हु जियानगुआन सोबत होणार आहे.





भारतीय बॉक्सर्सची दमदार कामगिरी, पाच बॉक्सर्सचं ऑलिम्पिकचं तिकिट कन्फर्म

याआधी सतीश कुमार, पूजा रानी, विकास कृष्ण, लवलीना बोरगोहेन आणि आशिष चौधरी अशी या पाच बॉक्सर्सनी आपलं टोकियो आलिम्पिकचं तिकिट कन्फर्म केलं आहे. क्वालिफायर राऊंडमध्ये पूजा रानीने 75 किलो वजनी गटात थायलंडच्या पोम्नीपा क्युटीचा 5-0 असा पराभव करत सेमीफायनल गाठली. आशिष कुमारने देखील 75 किलो वजनी गटात इंडोनेशियाच्या बॉक्सरला पराभूत करत ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.





लवलीना बोरगोहेन 69 किलो वजनी गटात उज्बेकिस्तानच्या मक्तूनाखोन मेलिवाला 5-0 ने हरवलं. विकास कृष्णने 69 किलो वजनी गटात जपानच्या सेवोनरेट्स ओकाजावाला 5-0 ने पराभूत केलं. तर सतीश कुमारने 91 किलो वजनी गटात मंगोलियाच्या ओगोनबायर दाइवी को 5-0 ने पराभूत केलं आहे. या सर्वांनी आधीच आपल्या मॅच जिंकत ऑलिम्पिक स्पर्धेत एन्ट्री मिळवली आहे. याशिवाय आज साक्षी चौधरी (57 किलो), अमित पंघाल (52 किलो), मनीष कौशिक (63 किलो), मेरीकॉम (51 किलो) आणि सिमरनजीत (60 किलो) गटातून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवू शकतात.