मुंबई : तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत आपल्या बिनधास्त अंदाज आणि स्टाईलसाठी ओळखले जातात. सिनेमात त्यांचे स्टंट्स असो किंवा स्टाईल, प्रेक्षकांच्या मनावर कायमच छाप पाडून जातात. रजनीकांत आणि बेअर ग्रिल्स यांचा 'इंटू द वाईल्ड विद बेअर ग्रिल्स अॅण्ड सुपरस्टार रजनीकांत'च्या आगामी शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या एपिसोडमध्ये बेअर ग्रिल्ससोबत रजनीकांत दिसणार आहे. 60 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये रजनीकांत यांचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. रजनीकांत आणि बेअर ग्रिल्स यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सोबतच लोक यावर कमेंट्सही करत आहेत. या ट्रेलरमध्ये रजनीकांत आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये गॉगल घालतानाही दिसत आहेत. डिस्कव्हरी वाहिनीवर 23 मार्च रोजी हा एपिसोड प्रसारित होणार आहे.


'इंटू द वाईल्ड विद बेअर ग्रिल्स अॅण्ड सुपरस्टार रजनीकांत'च्या या ट्रेलरमध्ये रजनीकांत आणि बिअर ग्रिल्स, दोघेही पुलावर लटकताना, जनावरांचा सामना करताना तर कुठे दोरीवर चालताना दिसत आहेत. या प्रोमोचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करताना बेअर ग्रिल्सने लिहिलं आहे की, "सुपरस्टार रजनीकांत यांची सकारात्मकता आणि लढाऊ वृत्ती जंगलातही दिसली, ज्यामुळे त्यांनी सर्व आव्हानांचा सामना केला. पाहा इंटू द वाईल्ड विद बेअर ग्रिल्स, 23 मार्च रोजी रात्री 8:00 वाजता."






रजनीकांत आणि बेअर ग्रिल्स यांच्यासाठी 'इंटू द वाईल्ड विद बियर ग्रिल्स'चं चित्रीकरण कर्नाटकच्या बांदीपूर टायगर रिझर्व पार्कमध्ये करण्यात आलं आहे. या चित्रीकरणादरम्यान रजनीकांत जखमी झाल्याचंही वृत्त होतं. मात्र यानंतर स्वत: बेअर ग्रिल्सने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एवढंच काय बांदीपूर टायगर रिझर्व पार्कमध्ये चित्रीकरणामुळे अनेकांनी दोघांच्या अटकेचीही मागणी केली होती. या टायगर रिझर्व पार्कमध्ये चित्रीकरणासाठी तिथे उपस्थित असलेल्या शोच्या कर्मचाऱ्यांमुळे जनावरं आणि पर्यावरणाला धोका उद्भवू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं.


याआधी पंतप्रधान मोदींसोबतही चित्रीकरण
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बेअर ग्रिल्ससोबत दिसले होते. पंतप्रधान मोदींच्या त्या एपिसोडचं चित्रीकरण उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये झालं आहे. यात ग्रिल्स आणि मोदी अॅडव्हेंचर करताना दिसते होते. 530 चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या घनदाट जंगलात हत्ती, वाघ आणि मगर मोठ्या प्रमाणात होत्या.