हॅमिल्टन : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या मालिकेतील चौथ्या वन डे सामन्यात ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकला दुखापत झाली. धाव घेताना थ्रो थेट त्याच्या डोक्यावर आदळला, ज्यावेळी त्याने हेल्मेटही घातलेलं नव्हतं. चेंडू डोक्यात लागताच मलिक मैदानात जागीच कोसळला.


शोएब मलिकला चेंडू लागताच पाकिस्तानच्या फिजिओंना मैदानात बोलावण्यात आलं आणि त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याने फलंदाजी चालूच ठेवली. मात्र या सामन्यात तो केवळ 6 धावा करु शकला. या सामन्यात मलिक क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव झाला.

फिरकीपटू गोलंदाजी करत असताना शोएब मलिक फलंदाजीसाठी उतरला, ज्यामुळे त्याने हेलमेट वापरणं गरजेचं समजलं नाही. 32 व्या षटकात तो धाव घेण्यासाठी पळाला, मात्र नॉन स्ट्राईकला असलेल्या मोहम्मद हाफीजने त्याला परत जाण्याचा इशारा केला. परत जात असतानाचा कॉलिन मुन्रोने फेकलेला थ्रो थेट मलिकच्या डोक्यावर आदळला.

हेल्मेट घातलेला नसताना चेंडू एवढा जोरात आदळला की मलिक क्षणातच खाली कोसळला. यानंतर तातडीने पंच आणि न्यूझीलंडचे खेळाडू एका जागी जमा झाले.फिजिओंकडून उपचार करण्यात आल्यानंतर मलिक फलंदाजीसाठी उठला.

पाहा व्हिडीओ :