मुंबई : मे महिन्यात 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. हा वर्ल्ड कप कोण जिंकणार याबद्दल सध्या अनेक ठिकाणी चर्चा सुरु आहेत. भारत, इंग्लड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे संघ सातत्याने चांगली कामगिरी करत असल्यामुळे या संघांमध्ये वर्ल्डकपसाठी मोठी चुरस असणार, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे. त्याचवेळी भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 2019 चा वर्ल्डकप कोण जिंकणार याबाबत त्याचं मत मांडलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मते भारतीय संघ हाच 2019 च्या वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार आहे. गेल्या दोन वर्षांमधली भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय संघ आगामी वर्ल्डकप जिंकू शकतो, असे सचिनने म्हटले आहे. परंतु तेंडुलकरने भारतीय संघाला संभाव्य धोक्याचीही जाणीव करून दिली. जेतेपदाच्या शर्यतीत भारताला इंग्लंडच्या संघाकडून कडवे आव्हान मिळू शकते, असे तेंडुलकरने म्हटले आहे.
भारताला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या संघाकडून कडवे आव्हान मिळू शकते, त्यामुळे इंग्लंडपासून सावध राहण्याचा इशारा सचिनने दिला आहे. 2015 साली झालेल्या वर्ल्डकपनंतर भारताने सरासरी 67.09 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 66.23 च्या सरासरीने सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. तसेच इंग्लंडचा संघ जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, भारत मात्र दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोन संघामध्ये मोठी चुरस असणार हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
भारतीय संघाने रविवारी झालेल्या हॅमिल्टन वनडेमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवून पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 ने खिशात घातली. त्याअगोदर न्यूझीलंडच्या संघाचा कसोटी मालिकेतही भारताने पराभव केला. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियालादेखील त्यांच्याच भूमीवर नमवले.
बॉल टेम्परिंगच्या आरोपांमुळे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. हा एक वर्षाचा कालावधी पुढील दीड महिन्यात संपणार आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे ऑस्ट्रेलियन संघात लवकरच पुनरागमन होईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघही जोरदार मुसंडी मारू शकतो, असा विश्वास तेंडुलकरने व्यक्त केला. स्मिथ आणि वॉर्नरमुळे संघातील जोश आणखी वाढेल आणि हा संघ जेतेपदाच्या शर्यततीतही परतेल, असा विश्वासही तेंडुलकरने व्यक्त केला आहे.
'हा' संघ वर्ल्डकप जिंकणार, सचिनची भविष्यवाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2019 10:59 AM (IST)
मे महिन्यात 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. सातत्याने चांगली कामगिरी करणारे भारत, इंग्लड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे संघ वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार आहेत. परंतु सचिनने 'या' संघाला पसंती दर्शवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -