मुंबई : कर्करोग कधी कोणाला विळखा घालेल, सांगता येत नाही. बॉलिवूड, क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींनाही कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यापैकी काही जणांनी कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली आणि कर्करोगमुक्त आयुष्याला सुरुवात केली, तर काही सेलिब्रेटींना कर्करोगाने हात टेकायला लावले. त्यापैकी काही सेलिब्रेटींचा आढावा
युवराज सिंग : कर्करोगाशी झुंज दिलेल्या सेलिब्रेटींमध्ये क्रिकेटपटू युवराज सिंहचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. 2011 मधील विश्वचषकानंतर युवराज आजारी पडला होता. त्यानंतर युवराजला पहिल्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. वर्षभर अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर युवराज भारतात परतला. त्याने भारतीय क्रिकेट संघात पुनरागमनही केलं आहे.
मनिषा कोईराला : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री मनिषा कोईराला हिला वयाच्या 42 व्या वर्षी कर्करोगाने ग्रासलं होतं. मनिषाला 2012 मध्ये अंडाशयातील (ओव्हरियन) कॅन्सरचं निदान झालं होतं. काही शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीनंतर तीन वर्षांनी मनिषाचा कर्करोग आटोक्यात आला.
लिसा रे : बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे हिला 2009 मध्ये कर्करोग झाल्याचं समजलं होतं. तिला निदान झालेल्या 'मल्टिपल मायलोमा'मध्ये बोन मॅरोमधील पांढऱ्या रक्तपेशींवर परिणाम होतो. हा अत्यंत दुर्धर कर्करोग मानला जातो. सेल ट्रान्सप्लांट केल्यानंतर 2010 मध्ये तिने आपण कर्करोगमुक्त झाल्याचं जाहीर केलं. लिसाने वॉटर, बॉलिवूड हॉलिवूड, कसूर यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
राजेश खन्ना : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार अशी ख्याती असलेल्या राजेश खन्ना यांना 2011 मध्ये कर्करोग झाल्याचं निदान झालं. वर्षभरातच त्यांची कॅन्सरशी झुंज संपली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुमताझ : साठच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मुमताझ यांनाही कर्करोगाने ग्रासलं होतं. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांना स्तनाचा कर्करोग झाला होता. आता, म्हणजेच 11 वर्षांनंतर त्या कर्करोगमुक्त आयुष्य जगत आहेत. मुमताझ यांनी राजेश खन्ना, दिलीप कुमार, शम्मी कपूर यासारख्या अनेक अभिनेत्यांसोबत भूमिका केल्या होत्या.
नर्गिस : ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील सुंदर अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा कर्करोगाने बळी घेतला. नर्गिस यांना 1980 मध्ये पँक्रिअॅटिक कॅन्सरने पछाडलं होतं. न्यूयॉर्कमध्ये उपचारांनंतर त्या भारतात परतल्या. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर नर्गिस कोमात गेल्या. मुलगा संजय दत्तचं बॉलिवूड पदार्पण पाहण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
आदेश श्रीवास्तव : कर्करोगाने बळी घेतलेला आणखी एक बॉलिवूड सेलिब्रेटी म्हणजे संगीतकार आदेश श्रीवास्तव. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर अवघ्या 40 दिवसांत त्यांचे प्राण गेले. वयाच्या अवघ्या 51 व्या वर्षी श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला.
अनुराग बसू : बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक अनुराग बसू यांनाही कर्करोगाचा सामना करावा लागला होता. 2004 मध्ये त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना फक्त तीन महिन्यांची मुदत दिली होती, मात्र सुदैवाने त्यांचा कर्करोगाशी लढा यशस्वी ठरला.
बार्बरा मोरी : हृतिक रोशनसोबत 'काईट्स' चित्रपटात बार्बरा झळकली होती. 2010 मध्ये तिला कर्करोगाचं निदान झालं. सुदैवाने त्याच वर्षी ती उपचारांती बरी झाली.
इरफान खान : अभिनेता इरफान खानने मार्च 2018 मध्ये आपल्याला न्यूरोएंडोक्राईन कॅन्सरने ग्रासल्याचं जाहीर केलं. लंडनमध्ये सध्या तो उपचार घेत आहे.
सोनाली बेंद्रे : बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सोनाली न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन नुकतीच मायदेशी परतली.
राकेश रोशन : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती पुत्र आणि अभिनेता हृतिक रोशनने दिली होती. इन्स्टाग्रामवर भावपूर्ण पोस्ट टाकत हृतिकने वडिलांच्या आजारपणाविषयी माहिती दिली.
जागतिक कर्करोग दिन | कॅन्सरशी झुंज दिलेले 12 सेलिब्रेटी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2019 08:31 AM (IST)
बॉलिवूड, क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींना कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यापैकी काही जणांनी कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली आणि कर्करोगमुक्त आयुष्याला सुरुवात केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -