याबाबत अभिनेता अक्षय कुमारने धारदार शब्दात आपला राग व्यक्त केल्यानंतर, आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही पुढे आला आहे.
"हा देश सुरक्षित आणि सर्वांसाठी समान असायलाच हवा.
महिलांना दुय्यम स्थान का? चला आपण एकत्र येऊ आणि
अशा घृणास्पद घटनांविरोधात उभे राहू"
असं ट्विट विराट कोहलीने केलं आहे.
इतकंच नाही तर विराटने यासोबत स्वत:चा व्हिडीओ मेसेजही शेअर केला आहे.
विराट म्हणतो, "बंगळुरुमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री जे काही घडलं ते अत्यंत संतापजनक होतं. त्या मुलीबाबत छेडछाड होत असताना, केवळ बघ्याची भूमिका घेणारे भ्याड आहेत. त्यांना पुरुष म्हणणंही चुकीचं ठरेल. जर तुमच्या कुटुंबातील स्त्री/मुलीसोबत अशी घटना घडली असती, तर त्यावेळीही तुम्ही अशीच बघ्याची भूमिका घेतली असती, की तिला मदत केली असती?
त्या मुलीने तोकडे कपडे घातले होते, म्हणून तिच्यासोबत अशी घटना घडली, असं म्हणणारे अशा नराधमांच्या कृत्याला एकप्रकारे पाठबळ देतात.
मात्र कोणत्याही व्यक्तीला किंवा त्या मुलीला तीने काय घालावं, कसं राहावं, कसं जगावं हा तिचा/त्याचा प्रश्न आहे, तिचं स्वातंत्र्य आहे. तोकड्या कपड्यातील मुलीची छेड काढणं जर कोणाला संधी वाटत असेल आणि जे लोक या कृत्याचं समर्थन करत असतील तर ते अतिशय भयानक आहे"
"अशी विकृत मानसिकता असणं धक्कादायक आहे आणि अशी माणसं आपल्या समाजात आहेत, आणि मी या सोसायटीचा भाग असणं याची मला लाज वाटते. आपण आपली विचारधारा बदलायला हवी. महिलांना सन्मान देणं शिकायला हवं. बंगळुरुतील घटनेतील मुलगी तुमच्या घरातील असती, तर तुम्ही काय केलं असता, हा पुन्हा एकदा विचार करा, जय हिंद"
https://twitter.com/imVkohli/status/817230961116999680
बंगळुरुतील घृणास्पद प्रकार
आयटी हब बंगळुरुमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाही मुलींचा विनयभंग झाला. त्यानंतर एका तरुणीची भर रस्त्यात छेडछाड झाली.
नववर्षाच्या पार्टीनंतर घरी परतणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. भर रस्त्यात मध्यरात्री दोन नराधम तरुणीवर जबरदस्ती करत असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.
शहरातील कम्मनहळ्ळी भागात राहणारी ही तरुणी मध्यरात्री अडीच वाजता आपल्या घरी परतत होती. रिक्षातून उतरल्यानंतर घरी चालत परतत असताना, मागून आलेल्या दोन बाईकस्वारांनी तिला अडवलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली.
सुमारे 30 सेकंदाच्या घृणास्पद प्रकारानंतर तरुणीने आरडाओरडा केला. त्यानंतर नराधमांनी तिला ढकलून तिथून पळ काढला.
संबंधित बातमी