मुंबई: 'नोटबंदीमुळे रस्त्यावर विवस्त्र होण्याची वेळ आलेल्या त्या महिलेसाठी तरी सहानुभूतीचे दोन शब्द बोला.' अशा शब्दात पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना'मधून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. 'आमच्या पोटात दुखते, पण तुमच्या पोटात का दुखत नाही?', असा उपरोधिक सवाल सामनामधून सरकारला विचारण्यात आला आहे.


नोटाबंदीनंतर शिवसेनेनं वारंवार भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सामनातील अग्रलेखामधून मोदींवर अनेकदा टीकाही करण्यात आली आहे. याच प्रश्नावरुन सामनातून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. 'देशात अराजक कधीही निर्माण होऊ शकते त्यामुळे ही दारुण अवस्था पाहून आमचे पोट दुखते तर तुमचे का दुखत नाही.' असा सवाल सामनातील अग्रलेखामधून करण्यात आला आहे.

एक नजर 'सामना'तील अग्रलेखावर:

पण तुमच्या पोटात का दुखत नाही?

* नोटाबंदीमुळे सामान्य जनता व गृहिणींच्या बचतीची रद्दी झाली आहे आणि गरीबांच्या नोकर्‍या, रोजगार जात असल्याने त्यांच्या पोटातील भुकेने नवे अराजक केव्हाही निर्माण होऊ शकते. खरे तर याच भीतीने आमच्यासारख्यांच्या पोटात भीतीचा गोळा येत आहे, पण तुमच्या पोटात गोळा का येत नाही? छातीत कळ का येत नाही? ही दारूण अवस्था पाहून आमचे पोट दुखते, तुमचे का दुखत नाही? तुम्ही स्वत:ला जनतेचे हितकर्ते म्हणवून घेता ना, मग सर्वात आधी ही कळ तुमच्या पोटात यायला हवी. आता किमान नोटाबंदीमुळे रस्त्यावर विवस्त्र होण्याची वेळ आलेल्या त्या महिलेसाठी तरी सहानुभूतीचे दोन शब्द बोला.

* ३१ डिसेंबर २०१६ पासून ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझर्व्ह बँकेत बदलता येतील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस करूनही रिझर्व्ह बँकेने त्यास हरताळ फासला. त्यामुळे संतापलेल्या एका गरीब महिलेने रिझर्व्ह बँकेच्या दारातच अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. ही गरीब महिला चिमुकल्या बाळाला घेऊन जुन्या नोटा बदलण्यासाठी आली होती. गेटवरच्या सुरक्षा रक्षकांनी तिला धक्के मारून हाकलून दिले. तिला त्यामुळे रडू कोसळले. तिचे तान्हे मूलही रडू लागले. शेवटी पंतप्रधानांपर्यंत हा नोटाबंदी अत्याचार पोहोचावा म्हणून ती रिझर्व्ह बँकेसमोर निर्वस्त्र झाली व ओक्साबोक्शी रडू लागली. आमचे मुख्यमंत्र्यांना असे कोडे आहे की, आता तुम्ही सांगा, तुम्ही नक्की कुणाच्या बाजूने आहात? ‘नोटाबंदी’च्या बाजूने आहात की त्या रस्त्यावर रडणार्‍या, न्याय मागण्यासाठी विवस्त्र झालेल्या सामान्य महिलेच्या बाजूने आहात? ती जी महिला आहे तिचे दु:ख व यातना सरकारला समजले नसेल तर इतके निर्घृण आणि बधिर सरकार गेल्या दहा हजार वर्षांत झाले नसेल.

* एक अबला भररस्त्यावर कपडे उतरवून सरकारचा निषेध करते हेसुद्धा दिल्लीच्या रस्त्यावर घडलेले सरकार पुरस्कृत ‘निर्भयाकांड’ आहे. महिलांचे दबलेले हुंदके व संताप या निर्भयाने रस्त्यावर आणला. ती बाई निर्वस्त्र झाली यालाही आपण देशभक्तीच म्हणणार असाल तर तुमची डोकी तपासायला ‘तालिबानी’ डॉक्टरांनाच बोलवावे लागेल. अशा प्रकारचे महिलांवरील अत्याचार फक्त तालिबानी राजवटीतच घडू शकतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे पुन: पुन्हा असे सांगणे आहे की, (पुण्यातील टॉय ट्रेनच्या उद्घाटन सोहळ्यात) ‘‘सामान्य माणूस नोटाबंदीचा त्रास सहन करतो, पण काही लोकांना फार त्रास होतो. त्यांना माझा सवाल आहे की, तुम्ही नक्की कुणाच्या बाजूने आहात? तुमचे समर्थन भ्रष्टाचाराला आहे की भ्रष्टाचारमुक्तीला? एकदा तुम्ही स्पष्ट करून टाका. काळा पैसावाल्यांच्या नोटांची रद्दी होत असेल तर तुमच्या पोटात का दुखते?’’ मुख्यमंत्र्यांचा निष्पाप सवाल बिनतोड आहे. मात्र आता ‘नोटाबंदी’मुळे विवस्त्र झालेल्या महिलेचा संताप पाहून त्यांच्या पोटातील पाणीही हलले नसेल तर ती त्यांची मजबुरी आहे.

* नंदुरबार जिल्ह्यातील करमाडी गावात खात्यात पैसे असूनही मुलाच्या लग्नासाठी ते मिळत नसल्याने एका वृद्ध महिलेने स्वत:चे जीवन संपवून घेतले. दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण या गावात बँकेत गेलेल्या शेतकर्‍याने पैसे मागितल्याचा राग येऊन बँक मॅनेजरने त्याला बूट फेकून मारल्याची घटना घडली. या दोन्ही घटना गुरुवारीच घडल्या. म्हणजे नोटाबंदी निर्णयाला दोन महिने होत आले तरी सामान्यजनांचे हाल आणि त्यांचा बळी जाण्याचे सत्र कायमच आहे.