सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या या समितीनं शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर त्याच बरोबर 2019 च्या विश्वचषकापर्यंत गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीर खानची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल द्रविड हा भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यांमध्ये फलंदाजी सल्लागाराची भूमिका बजावेल.
परदेशातील कसोटी दौऱ्यांमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांना मार्गदर्शनाची जबाबदारी ‘द वॉल’वर असणार आहे. परदेशातील धावपट्टीवर नेहमीच चांगली खेळी करणारा खेळाडू म्हणून राहुल द्रविडची ओळख होती. त्यामुळेच परदेशात राहुल द्रविडला ‘मिस्टर डिपेंडंट’ असंही संबोधलं जायचं. आता राहुल द्रविड परदेशातील खेळपट्टीवर कसं खेळायचं, याबाबतीत भारतीय खेळाडूंना धडे देणार आहे.
राहुल द्रविडने भारताकडून 164 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 286 इनिंगमध्ये त्याने 52.31 च्या सरासरीने 13 हजार 288 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये 36 शतकं आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीतील भरवशाचा खेळाडू म्हणून राहुल द्रविडची ओळख होती.
मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री
विराट कोहलीशी झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर अनिल कुंबळेनं भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया मुख्य प्रशिक्षकाविनाच विंडीज दौऱ्यावर गेली होती. आता आगामी श्रीलंका दौऱ्यापासून शास्त्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारतील. 2019 च्या विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री आणि झहीर खानची नियुक्ती करण्यात आली आहे.
टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दोघांशीही रवी शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत. ऑगस्ट 2014 ते जून 2016 या काळात टीम इंडियाचे संचालक म्हणून काम केलेल्या रवी शास्त्री यांचे संघातील खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. याचाच फायदा त्यांना झाला आहे.
झहीर खान गोलंदाजी प्रशिक्षक
ज्याच्या स्विंगने जगभरातील दिग्गज फलंदाजांच्या मनात धडकी भरायची अशा झहीर खानची भारतीय संघाच्या गोलंदाज सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
झहीर खाननं आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत मोठं योगदान दिलं आहे. याचाच विचार करुन सीएसीनं झहीर खानला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त केलं आहे. झहीर खाननं 92 कसोटीत 311 बळी तर 200 वनडेत 282 बळी त्यानं घेतले आहेत. तर 17 टी-20 सामन्यात 17 बळी त्याच्या नावावर आहे.