नाशिक : नाशिकमधल्या तिडके कॉलनीत दारु दुकानाच्या विरोधात महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. स्थानिक रहिवाशांचा विरोध असतानाही सुरु होत असलेल्या नव्या वाईन शॉपमधल्या दारुच्या बाटल्यांचे बॉक्स संतप्त महिलांनी रस्त्यावर आणून फेकले. यावेळी पोलिस, वाईन शॉप मालकांचे बॉक्सर आणि स्थानिक महिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.


तिडके कॉलनीतल्या लंबोदर अव्हेन्युमध्ये सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. स्थानिकांचा विरोध असतानाही हिरा वाईन शॉपच्या मालकांनी 2 ट्रक दारुचा माल इथे आणला. स्थानिकांनी यासंदर्भात तीन वेळा जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या दुकानाला विरोध केला होता. मात्र, दुकान नाही, तर गोडाऊनसाठी वापर करु असं सांगत व्यावसायिकांने दारुचे बॉक्स इथे ठेवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी स्थानिक महिला आणि दारु व्यावसायिकाच्या बॉक्सरमध्ये शाब्दिक चकमक झाली. महिलांनी दारुचे बॉक्सेस काढून रस्त्यावर फेकले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

पोलीसांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची री ओढल्याने स्थानिक आणि पोलीसांतही वाद झाले. अखेर महिलांचा आक्रमकपणा पाहून पोलिसांनीही माघार घेतली. पोलिसांनी दारु व्यावसायिकास माल परत घेऊन जाण्यास सांगितल्याने तणाव निवळला.