मुंबई: डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणातील 'डेडमॅन' अर्थात अंडरटेकरने अखेर निवृत्ती घेतली आहे. अंडरटेकरच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियाने त्याला अनोखं अभिवादन केलं.

नव्वदच्या दशकापासून ते आजपर्यंत टीव्हीसमोर मुठ्या आवळून हाणामारीचा खेळ पाहणाऱ्यांसाठी अंडरटेकर हे नाव नवं नाही.

या काळातील मुलांना डब्ल्यूडब्ल्यूई हा शो खेळापेक्षाही खूप मोठा आहे. त्यातील अंडरटेकर हे नाव तर सर्वांना परिचीत आहे.

वेगवेगळ्या रेसलर्सचे कार्ड जमवणं, गेम खेळणं किंवा तासानतास टीव्हीसमोर फाईट बघत राहणं हा या दशकातील मुलांचा आवडता छंद. कदाचित क्रिकेटनंतर किंवा क्रिकेटसोबत सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून डब्ल्यूडब्ल्यूईकडे पाहिलं जात असावं.



केज मॅच, लास्ट मॅन स्टँडिंग, स्लेज हॅमर, रेसलमेनिया, टॅग टीम चॅम्पियन, रॉ, स्मॅकडाऊन यासारख्या चॅम्पिन्सशीप तर पोरांना तोंड पाठ आहेत.

जॉन सिना, रे मेस्टिरो, बिग शो, स्टोन कोल्ड, केन, शॉन मायकल, ट्रिपल एच, रॅन्डी ऑर्टन, बटिस्टा ही नावं तर कोणीही विसरु शकणार नाही. मात्र या सर्वात अंडरटेकर हे नाव धडकी भरवणारंच होतं.

अंडरटेकर का खास होता?

अंडरटेकर रिंगमध्ये उतरला आणि तो जिंकला नाही, हे क्वचितच दिसलं असेल. अंडरटेकर रिंगमध्ये येण्यापूर्वी होणारा अंधार, मग निळी लाईट आणि वाजणारी घंटा यामुळे रिंगमधील विरोधी रेसलरची आणि उपस्थित प्रेक्षकांचीही धाकधूक वाढायची.

अंडरटेकरची सिग्नेचर ट्यून आजही अनेकांची मोबाईल रिंगटोन आहे. अंधारच त्याची ओळख होती.



ज्यावेळी रेसलर्स आपल्यासोबत सुंदर 'हसिना' घेऊन यायचे, त्यावेळी अंडरटेकरची एण्ट्री शवपेटीतून व्हायची. अंडरटेकर मार खाऊन पडला की लोक समजायचे हा थोड्यावेळाने उठणार आणि विरोधी रेसलरला शेवटी एकाच ठोशात हरवणार. हे व्हायचही तसंच. मग एकच जल्लोष सुरु व्हायचा.

कोण आहे अंडरटेकर?

द अंडरटेकर हे नाव वेगळं पण लक्षात राहणारं आहे. मात्र WWE च्या रिंगबाहेरचं त्याचं जग कसं आहे, हे मात्र बहुतेकांना माहित नाही.

अंडरटेकरचं खरं नाव मार्क विलियम कॅल्वे आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये 24 मार्च 1965 रोजी जन्मलेल्या मार्क कॅल्वेने टेक्सास विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं.

मार्क विलियम कॅल्वेने 1984 मध्ये वर्ल्ड क्लास चॅम्पियन्सशीप रेसलिंगमध्ये भाग घेतला. मग 1989 मध्ये 'मीन मार्क'च्या रुपात तो वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या रिंगमध्ये पोहोचला. त्यानंतर 1990 मध्ये मार्क विलियम कॅल्वेचा प्रवास तत्कालिन WWF च्या मंचावर सुरु झाला.



अंडरटेकरने आधी WWF मग WWE च्या रिंगमध्ये 27 वर्षे अधिराज्य गाजवलं. मात्र त्याने जेव्हा अलविदा केला, तेव्हा अंडरटेकर त्याच्या स्टाईलमध्ये परत यावा, तो रिंगमध्ये उतरावास अशीच भावना सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.

शवपेटी ते बाईक एण्ट्री

शवपेटीतून येणारा अंडरटेकरची सिग्नेचर ट्यून जशी धडकी भरवणारी होती, तशीच त्याची एण्ट्री जबरदस्त. शवपेटीतून येणार अंडरटेकर 2000-01 च्या काळात भारदस्त बुलेटमधून येऊ लागला. पण पुन्हा 2004 च्या दरम्यान त्याने जुनीच एण्ट्री कायम ठेवली.

ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन

WWE मध्ये अंडरटेकर आणि केन ही जोडी म्हणजे जय-वीरुच. कोणी त्यांना सख्खे भाऊ तर कोणी सावत्र भाऊ म्हणत होतं. WWE च्या स्टोरीलाईनमध्ये सुरुवातील केन आणि अंडरटेकर दुश्मन होते. मात्र नंतर दोघेही एकत्र आले आणि 'ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन' सुरु झालं.

रिंगमध्ये किताब, तर रिंगबाहेर मनं जिंकली

अंडरटेकरने रेसलमेनियात सलग 21 किताब पटकावले. मात्र त्याचा मोठा विजय म्हणजे प्रोफेशनल रेसर्सची आणि खासकरुन प्रेक्षकांची मनं जिकणं.

ना चिटिंग, ना रडीचा डाव, यामुळे अंडरटेकर नेहमीच प्रेक्षकांच्या काळजात घर करुन राहिला. त्यामुळे अंडरटेकरच्या निवृत्तीमुळे अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.