बर्मिंगहॅम : उद्यापासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान अॅशेस मालिकेतली पहिली कसोटी खेळवण्यात येणार आहे. पण या कसोटीला एक वेगळ महत्व असणार आहे. कारण या मालिकेपासून आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता कसोटी क्रिकेटलाही नवी संजीवनी देण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे. यासाठीच टेस्ट चॅम्पियनशीप हे आयसीसीनं उचललेलं महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमधल्या अॅशेस मालिकेतल्या पहिल्या कसोटीपासून या विजेतेपदाच्या संग्रामाला सुरुवात होत आहे. त्यात कसोटी मान्यता असलेले बारापैकी नऊ संघ सहभागी होणार आहेत. या नऊ संघांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.


1 ऑगस्ट 2019 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान या सर्व संघांमध्ये एकूण 27 मालिका खेळवल्या जातील. प्रत्येक संघ सहा कसोटी मालिका खेळेल. त्यात 72 कसोटी सामन्यांचा समावेश असेल. त्यातून पहिल्या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठीचा सामना 10 ते 14 जून 2021 ला लंडनच्या लॉर्डसवर खेळवण्यात येईल.



कसोटी क्रिकेटचं नवं पर्व !
Photo : Getty Images

आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशीपचं सर्व सहभागी देशांनी स्वागत केलं आहे. विंडीज दौऱ्यावर निघण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंही या स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटमध्ये चुरस वाढणार असल्याचं म्हटलं आहे.

कसोटी क्रिकेटसाठी सत्तरच्या दशकापर्यंतचा काळ हा सुवर्णकाळ होता. पण त्यानंतर जानेवारी 1971 मध्ये वन डे क्रिकेटचा जन्म झाला आणि कसोटी क्रिकेटची लोकप्रियता ओसरु लागली. त्यानंतर सुमारे तीन दशकानंतर ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या रुपानं आणखी एक फॉरमॅट उदयाला आला. ज्यानं वन डे आणि कसोटी क्रिकेटपेक्षा अमाप लोकप्रियता मिळवली. या शर्यतीत कसोटी क्रिकेट कुठेतरी धडपडत होतं. त्या धडपडणाऱ्या कसोटी क्रिकेटला सावरण्यासाठीच आयसीसीनं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे.

असं म्हटलं जातं की 'टेस्ट क्रिकेट इस द बेस्ट क्रिकेट'. क्रिकेटच्या आजी माजी जाणकारांना विचाराल तर त्यांच्याकडूनंही हेच उत्तर मिळेल. पण आज ट्वेन्टी ट्वेन्टीच्या जमान्यात मागे पडलेल्या या टेस्ट क्रिकेटला ही टेस्ट चॅम्पियनशीप आता कशी तारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.