शिर्डी : शिर्डीमध्ये आज सरपंच आणि उपसरपंचांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजय औटी यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी 2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसंच या वर्षाच्या अखेरपर्यंत 30 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

'2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देण्यात येणार आहे. देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण होईल त्यावेळी राज्यात प्रत्येकाला घर मिळणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 

- 3 लाखांपेक्षा जास्त अतिक्रमण नियमित झाले, उर्वरित करणार आहोत
- या वर्षाच्या शेवटपर्यंत 30 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करू
- देशाच्या इतिहासात कुठल्याही राज्याने 30 हजार किलोमीटरचे दर्जेदार ग्रामीण रस्ते तयार केले नाही, फक्त महाराष्ट्राने केलेत
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तयार होणाऱ्या रस्त्यांना जागतिक बँकेचा निधी मिळाला, योजनेचा दुसरा टप्पा आता सूरु होणार
- 5 वर्षांत पिण्याच्या पाण्याच्या 18 हजार गावांच्या योजना पुर्ण करण्यात आल्या
- जलयुक्त शिवार योजनेला सरपंचांनी मातृत्व-पितृत्व देऊन जनतेची योजना बनवली
- पोपटराव पवार, अण्णा हजारे यांनी गावचे मॉडेल तयार केले
- आता अनेक गावांत मॉडेल गावे केली
- संगीत खुर्चीचा खेळ बंद करण्यासाठी सरपंच जनतेतून निवडणून आणायचा निर्णय घेतला
- पूर्वी चित्रपटात सरपंच म्हटले की निळू फुले दिसायचे आता तरुण काळ्या केसांचे सरपंच दिसतात, महिलांचा टक्का वाढतोय
- 3 ते 5 हजार पर्यंत मानधन वाढवले, तीन पटीने मानधन वाढवले हा केवळ ट्रेलर आहे 'पिक्चर अभि बाकी है'
- सरपंच, उपसरपंच यांना मानधन दिल्यानंतर सदस्यांना मिटिंग भत्ता दिला जाणार
- DPDC च्या मिटिंग मध्ये सरपंचाना प्रतिनिधीत्व मिळणार
- ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी राज्याची समिती तयार केली जाणार, ही समिती ज्या शिफारशी करेल त्या शिफारशींनुसार इन्कम वाढविण्यासाठी काम करणार
- सरपंचांसाठी लवकरच पुरस्कार दिला जाईल
- सरपंचासाठी कायदेशीर परिषद गठीत केली जाईल जी सरकार आणि सरपंच यांच्यादरम्यान सेतूचे काम करेल
- 15 व्या वित्त आयोगासोबत सरपंचांची मिटिंग लवकरच होईल, 14 व्या वित्त आयोगाच्या पैशात ग्रामपंचायतींना प्राधान्य
- ड्रोन द्वारे गावठाणाची मोजणीला आजपासून सुरवात केली, सर्व्ह ऑफ इंडियाच्या माध्यमातून 44 हजार गावांचे जीआयएस मॅपिंग दीड वर्षात मिळणार, डिजिटल स्वरूपात रेकॉर्ड राहणार
- शेती आणि ग्राम विकासासाठी 80 टक्के अनुदान देणार, शेतकऱ्यांना 12 महिने अविरत वीज मिळावी यासाठी सोलरवर 5 हजार मेगावॉट वीज तयार केली जाणार दीड दोन वर्षात वीज दिली जाणार
- ग्रामविकासासाठी सरकार कटिबद्ध आहे
- आमचे नवे सरकार आल्यावर तीन महिन्यांनी पुन्हा नवीन सरकार आपली बैठक घेणार

विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण